22 जूनपासून सुरू होत असलेल्या कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाची उद्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे.
यापूर्वी भारत-पाकिस्तान 2017 च्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने सामने आले होते. यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा 36-22 अशा फरकाने पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.
या स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी बुधवार दि.20 जूनला भारताचा कर्णधार अजय ठाकूरची प्रेस ट्रस्ट ऑफ इंडीया या वृत्तसंस्थेने मुलाखत घेतली होती. यामध्ये स्पर्धेविषयी अजय ठाकूरने आपली मते व्यक्त केली.
“खूप दिवसांनी पाकिस्तान बरोबर सामना होत असल्याने या सामन्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. पाकिस्तान विरुद्ध सामना असला की आमच्या भावना खूप वेगळ्या असतात. आम्ही संपूर्ण ताकदीनीशी पाकिस्तानला सामोरे जाणार आहोत.” असे डू ऑर डाय स्पेशलिस्ट रेडर अजय ठाकूर म्हणाला.
“पाकिस्तान विरुद्ध खेळताना कायमच दबाव असतो. पण आमचा संघ समतोल आणि युवा आहे. जेव्हा तुमच्याकडे युवा खेळाडू असतात ती तुमची जमेची बाजू असते आणि युवा खेळाडूंमुळे तुमचा संघ आक्रमक खेळ करतो.” असे भारतीय कर्णधार म्हणाला.
भारतीय संघाकडे राहुल चौधरी, प्रदिप नरवाल, अजय ठाकूर, रिशांक देवाडिगा, रोहित कुमार आणि मोनू गोयत यांच्या रूपाने आक्रमक रेडर्स आहेत.
तर गिरीश ऐरनाक, मनजीत चिल्लर, सुरेंदर नाडा आणि दिपक हुड्डा हे तगडे बचावपटू आहेत.
या भारतीय कबड्डीपटूंमधील मोनू गोयत, रिशांक देवाडीगा, दिपक हुड्डा आणि राहुल चौधरी हे 2018 प्रो-कबड्डी लिलावात करोडपती झाले आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर दबाव असेल का असे विचारल्यावर अजय म्हणाला, ‘ते चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे ते त्यासाठी पात्र होते. मला नाही वाटत त्यांच्यावर त्याचा दबाव असेल.’
या स्पर्धेनंतर भारत एशिया गेम्स या मोठ्या स्पर्धेत खेळणार आहे. त्याबद्दल अजय म्हणाला, ” या स्पर्धेमुळे आम्हाला एशिया गेम्सपूर्वी चूका सुधारण्याची चांगली संधी मिळणार आहे. आमच्याकडे आमच्या कमजोरीवर काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे आम्ही एशिया गेम्समध्ये उत्तम खेळ करु शकतो.”
कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, कोरिया, केनिया आणि अर्जेंटीना या देशांचे संघ सहभागी होणार आहेत.
कबड्डी मास्टर्स 2018 ही स्पर्धा दुबई येथे पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेला भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीने उद्यापासून सुरुवात
–कबड्डी मास्टर्स दुबईमध्ये टीम इंडियात तब्बल ४ करोडपती खेळाडूंचा समावेश