प्रत्येक खेळाडू कोणत्याही खेळात ओळख मिळवण्यासाठी बरीच मेहनत घेत असतो. यासाठी अनेकदा घरच्यांचा विरोध, कधी संधी न मिळणे, कधी खेळासाठी पुरेशा सुविधा नसणे अशा अनेक अडचणींनाही खेळाडू सामोरे जातात. भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार अजय ठाकूरनेही कबड्डी खेळण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. नुकतेच त्याने प्रो कबड्डी लीगतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमात वयाच्या १० व्या वर्षी कबड्डी खेळण्यासाठी घरातून पळून गेला असल्याचा खुलासा त्याने केला.
प्रो कबड्डी लीगतर्फे ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमातून आत्तापर्यंत अनेक खेळाडू चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. या कार्यक्रमाचे दुसरे सत्र कालपासून(४ ऑक्टोबर) सुरु झाले आहे. ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच भागात अजय ठाकूरने हजेरी लावली.
प्रो कबड्डी लीगच्या इन्स्टाग्राम हँडलवरून लाईव्ह पार पडलेल्या या कार्यक्रमात त्याने अनेक विषयांवर गप्पा मारल्या. यादरम्यान त्याने सांगितले की तो १० वर्षांचा असताना तो शाळेत गेला आणि तिथून ३२ किलोग्रॅम वजनी गटातील कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी पळून गेला. त्यावेळी कुटुंबातील सर्वजण खुप चिंतेत होते. पण तो ३-४ दिवसांनी परत आला आणि त्याने घरातील सदस्यांना त्याला मिळालेली बक्षीसे दाखवली. ते पाहून घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. ती बक्षीसे पाहुन अजयची आई फार आनंदी झाली होती.
तसेच अजयने यावेळी सांगितले की त्याची आई एका खाजगी शाळेत शिक्षिका होती. तर वडील हे कबड्डीपटू आणि कुस्तीपटू होते.
अजयने आत्तापर्यंत कबड्डीमध्ये मोठे यश मिळवले आहे. त्याने भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे. त्याचा २०१४ च्या एशियन गेम्स विजेत्या भारतीय संघात आणि २०१६ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात समावेश होता. त्याला अर्जून पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. पद्मश्री पुरस्कार मिळवणारा तो पहिला कबड्डीपटू आहे.