प्रो कबड्डी लीगतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमात आत्तापर्यंत अनेक खेळाडू चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. या कार्यक्रमाचे दुसरे सत्र रविवारपासून(४ ऑक्टोबर) सुरु झाले आहे. ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच भागात भारताचा माजी कर्णधार अजय ठाकूर उपस्थित होता. यावेळी त्याने अनेक गोष्टींबद्दल आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमादरम्यान त्याला विचारण्यात आले की त्याला कोणत्या खेळाडूकडून कोणती एखादी गोष्ट शिकायला किंवा त्या खेळाडूचा एखादा गुण घ्यायला आवडेल. यावर अजयने उत्तर दिले की तो राहुल चौधरीकडून दोन्ही बाजूंनी चांगली चढाई कशी करायची हे शिकेल. तर धर्मराज चेरलातनची ताकद त्याला घ्यायला आवडेल. याबरोबरच अजयने सांगितले की त्याला दिपक हूडा सारखा अष्टपैलू खेळ करायलाही आवडेल. तसेच कॅप्टन कूल अनुप कुमारप्रमाणेच वर्तणूक अंगीकारायला आवडेल, असेही अजयने सांगितले.
तसेच अजयने यावेळी असेही सांगितले की त्याने त्याच्या चुलत भावाकडून कबड्डी खेळण्याची प्रेरणा घेतली आहे. त्याचा चुलत भाऊ दक्षिण आशियाई गेम्समध्ये खेळला आहे. त्यावेळी त्याचे घरी खूप कौतुक झाले होते. ते पाहून अजयला प्रेरणा मिळाली. त्यालाही असाच सन्मान हवा होता.
अजय भारतातील एक यशस्वी कबड्डीपटू आहे. त्याने भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे. तसेच त्याचा २०१४ च्या एशियन गेम्स विजेत्या आणि २०१६ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात समावेश होता. त्याला अर्जून पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. पद्मश्री पुरस्कार मिळवणारा तो पहिला कबड्डीपटू आहे.