आयपीएल 2025 मध्ये अनेक संघांच्या कर्णधारांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यासाठीचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. एका रिपोर्टनुसार, गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) पुढील आयपीएल हंगामात अजिंक्य रहाणेला कर्णधार बनविण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं आहे.
केकेआरनं रहाणेला कर्णधारपदासाठी विकत घेतल्याचं ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात म्हटलं आहे. जेद्दाह येथे झालेल्या मेगा लिलावात केकेआरनं रहाणेला 1.5 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केलं होतं. या अहवालात एका सूत्राचा हवाला देऊन म्हटलं आहे की, “या क्षणी हे 90 टक्के निश्चित आहे की अजिंक्य रहाणे केकेआरचा कर्णधार असेल. तो कर्णधारपदाचा एक पर्याय असल्यामुळेच त्याला विकत घेण्यात आलं होतं.”
याआधी असे अहवाल देखील समोर आले होते, ज्यात म्हटलं होतं की केकेआर पुढील हंगामासाठी अष्टपैलू व्यंकटेश अय्यरकडे संघाची कमान सोपवू शकते. मेगा लिलावात वेंकटेशला फ्रँचायझीनं तब्बल 23.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. तथापि, रहाणे किंवा व्यंकटेश अय्यर यांच्यापैकी एक कर्णधार होण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी संघाची कमान सोपवण्यात आली नव्हती. मुंबई क्रिकेट असोसिएशननं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी श्रेयस अय्यरला मुंबईचा कर्णधार बनवलं आहे.
येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकातानं आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावलं होतं. आता केकेआर अशा खेळाडूला कर्णधार बनवण्याचा विचार करत आहे, ज्यानं भारतीय संघातील आपली जागा गमावली आहे आणि ज्याला मुंबईनं आपल्या टी20 टूर्नामेंटसाठी कर्णधार बनवलं नाही.
अजिंक्य रहाणे मागील दोन हंगामात (2023 आणि 2024) चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. आता केकेआरनं त्याच्यावर दाव खेळला आहे. याचा संघाला किती फायदा होतो हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
हेही वाचा –
“भारतात जा आणि भारताला हरवून या”, पाकिस्तानी दिग्गजाची संघाकडे स्पेशल मागणी
भारतीय संघ अजूनही WTC फायनलमध्ये कसा पोहचू शकतो? न्यूझीलंडच्या पराभवामुळे सर्व समीकरणं बदलली
काय सांगता! 95 चेंडूत केवळ 5 धावा दिल्या, या गोलंदाजानं मोडला उमेश यादवचा मोठा रेकॉर्ड