मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या इंदोर येथे सुरु असलेल्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. या स्पर्धतील सुपर लीग फेरीला 8 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच रहाणे बाहेर पडल्याने मुंबई संघाला धक्का बसला आहे.
मुंबई संघाने या स्पर्धेत दमदार खेळ केला आहे. आत्तापर्यंत साखळी फेरीतील 6 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवून मुंबई संघाने सी गटात अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच सुपर लीग फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
मुंबई संघासाठी जरी ही स्पर्धा चांगली ठरली असली तरी रहाणेला खास काही करता आले नाही. त्याने 9.67 च्या सरासरीने फक्त 58 धावा केल्या आहेत. पण त्याला या स्पर्धेतील साखळी फेरीत खेळतानाच काही दुखापतीचा त्रास जाणवत असल्याचे मुंबईचे निवड समीती अध्यक्ष अजित अगरकरने स्पष्ट केले आहे.
अगरकर म्हणाले, ‘साखळी फेरी दरम्यानच त्याला त्रास होत होता. पण तो खेळत होता. मात्र तो पुढे(सुपर लीग फेरीमध्ये) त्याचे 100 टक्के देऊ शकत नाही.’
त्यामुळे आता या रहाणेच्या ऐवजी श्रेयस अय्यर मुंबई संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. मुंबईचा पुढील सामना 8 मार्चला इंदोर येथे कर्नाटक विरुद्ध होणार आहे.
तसेच रहाणेच्या या दुखापतीवर आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचेही लक्ष असणार आहे. कारण रहाणे राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे. यावर्षीच्या आयपीएलला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘कॅप्टन कूल’ एमएस धोनी आता झळकणार वेबसिरीजमध्ये…
–त्या निर्णयामुळे सामन्याला मिळाली कलाटणी, कर्णधार कोहलीने केला खूलासा
–‘रनमशिन’ विराट कोहलीला या दिग्गजाने दिले नवीन टोपणनाव