संपूर्ण भारतात व विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या कठीण परिस्थितीत सर्वच क्षेत्रांकडून मदतीचा हात पुढे येत आहे. क्रिकेटमध्ये देखील ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स व ब्रेट ली यांनी भारताला आर्थिक निधी देऊन मदत केली आहे. तर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी 1 कोटींची मदत केली होती. यादरम्यानच भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने देखील कोरोना काळात मदत करत आपला खारीचा वाटा उचलला आहे, अशी बातमी समोर येत आहे.
कोरोनाच्या वाढत्या उद्रेकात ऑक्सिजनची सध्या नितांत गरज भासत आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन निर्मिती करण्यामागे आरोग्य यंत्रणेचा मोठा कल दिसून येत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची देखील आवश्यकता आहे. ऑक्सिजनच्या अभावे अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याची प्रकरणे समोर येत आहे. त्यामुळे सरकारने देखील याबाबत गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली आहे.
अशातच ” मिशन वायू ” या योजनेअंतर्गत अजिंक्य 30 ऑक्सीजन कॉंन्संट्रेटरची मदत करणार असल्याची बातमी समोर येत आहे. अजिंक्यने केलेली ही सर्व मदत महाराष्ट्रासाठी वापरली जाणार आहे.
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अँड ऍग्रिकल्चर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अजिंक्यचे आभार मानले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले ,”मिशन वायू अंतर्गत अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या 30 ऑक्सिजन कॉंन्संट्रेटरच्या मदतीसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत.” हे सर्व कॉंन्संट्रेटर महाराष्ट्राच्या गरज असलेल्या भागात पुरवले जाणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.
अजिंक्य सध्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. दिल्ली संघाकडून त्याला केवळ 2 सामन्यात संधी मिळाली असून अजिंक्यच्या समर्थकांना त्याला मैदानात खेळताना बघण्याची इच्छा आहे. अजिंक्य जरी आयपीएल खेळण्यात व्यस्त असला तरी त्याची समाजकार्याची ही आवड अनेकांना आगामी काळात प्रेरणादायी ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काहीदिवसांपूर्वी केलेले ‘ते’ ट्विट डिलिट करण्याचा ट्विटरकर्त्यांचा हरप्रीत ब्रारला सल्ला
पंजाब किंग्जने शेअर केला गेल आणि चहलचा शर्टलेस फोटो; नेटिझन्सकडून मीम्सचा सुळसुळाट