भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला अजिंक्य रहाणे सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धुमाकुळ घालतोय. रहाणेच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर मुंबईनं स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. रहाणेनं सात डाव खेळले असून त्यामध्ये त्यानं पाच अर्धशतकं झळकावली. रहाणेच्या सातत्यापेक्षा त्याच्या स्ट्राईक रेटची जास्त चर्चा आहे. विशेष म्हणजे, त्यानं प्रथम उपांत्यपूर्व आणि नंतर उपांत्य सामन्यातही अर्धशतक ठोकलं.
उपांत्य फेरीत मुंबईनं बडोद्याविरुद्ध 6 गडी राखून विजय मिळवल्यानंतर अजिंक्य रहाणे म्हणाला की, हा फक्त मानसिकतेत बदल आहे. इरादा एकच आहे आणि मला फार पुढचा विचार करायचा नाही. रहाणे म्हणाला, “जगभरात हा फॉरमॅट ज्या पद्धतीनं सुरू आहे, त्यावरून पहिली सहा षटकं खूप महत्त्वाची आहेत. तुम्हाला त्या पहिल्या सहा षटकांचा फायदा घ्यावा लागेल. जर सलामीवीर किंवा पहिल्या तीन फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, तर एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते.”
अजिंक्य रहाणे पुढे बोलताना म्हणाला, “माझ्या कसोटी पदार्पणापूर्वी मी देशांतर्गत क्रिकेटचे सहा सीझन रेड बॉल क्रिकेटनं खेळलो. त्यानंतर मी कसोटी पदार्पण केलं. मला अजूनही खेळाची आवड आहे. भारताचं प्रतिनिधित्व करण्याची माझ्यात असलेली आग अजूनही जिवंत आहे. मी नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी करू इच्छितो, मग ते देशांतर्गत क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट.”
रहाणे पुढे म्हणाला की, “रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सहा सामन्यांमध्ये मी कर्णधार होतो. आता निवडकर्त्यांना वाटले की श्रेयस चांगला कर्णधार असेल आणि तो उत्तम कामगिरी करत आहे. मी त्याच्या हाताखाली खेळत आहे याचा मला आनंद आहे. मला कोणत्याही कर्णधाराच्या हाताखाली खेळण्यात आनंद होतो. मी नेहमीच संघाचा विचार करतो.”
हेही वाचा –
विनोद कांबळी एकेकाळी विराट-जडेजापेक्षा फिट होता! या एका कारणामुळे बरबाद झालं करिअर
अखेरच्या कसोटी सामन्यात साऊदीचा बॅटनं धुमाकुळ! ख्रिस गेलच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी
गाबा कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया, चाहत्यांना खूश करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय!