भारतीय संघातून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे इंग्लंडमध्ये आपले कौशल्य दाखवत होता. रहाणे इंग्लंडच्या देशांतर्गत वनडे स्पर्धा आणि त्यानंतर काउंटी चॅम्पियनशिपमध्ये लिसेस्टरशायरकडून खेळत होता. मात्र, आता त्याला काउंटी चॅम्पियनशिपमधून मध्यातच माघार घ्यावी लागली आहे. रहाणेला अनेक दुखापती झाल्याने, वैद्यकीय पथकाने त्याला पुढे न खेळण्याची सूचना केली. त्यामुळे आता हा भारतीय फलंदाज लिसेस्टरशायरसाठी नॉर्थम्प्टनशायर आणि डर्बीशायरविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही.
दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर अजिंक्य रहाणेने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, “मी लिसेस्टरशायरसोबत माझ्या खेळाचा खरोखरच आनंद लुटला. आम्ही उत्कृष्ट क्रिकेट खेळलो. पुढील हंगामात संघासाठी अनेक उदयोन्मुख खेळाडू तयार आहेत. मला माझ्या संघसहकाऱ्यांसोबत खेळण्यात आणि माझ्या खेळात सुधारणा करण्यासाठी प्रशिक्षकांसोबत काम करण्यात खूप आनंद झाला. लिसेस्टरशायरच्या समर्थकांना भेटून त्यांची क्रिकेटची आवड पाहूनही छान वाटले. प्रत्येकाने माझे स्वागत केले. मला भविष्यात क्लबमध्ये परत यायला आवडेल.”
अजिंक्य रहाणेने वनडे कप स्पर्धेत लिसेस्टरशायरकडून एकूण 10 सामने खेळले. यामध्ये त्याने 42 च्या सरासरीने 378 धावा केल्या. यात चार अर्धशतकांचाही समावेश होता. त्याची सर्वोच्च धावसंख्या 71 होती. त्याचवेळी, काउंटी चॅम्पियनशिपच्या विभाग 2 मध्ये, त्याने तीन सामन्यांच्या सहा डावात 202 धावा केल्या, ज्यामध्ये एका शतकाचा समावेश होता.
मागील वर्षी भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. सातत्याने खराब कामगिरी केल्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील त्याचा फारसा विचार केला गेला नाही. भारतीय संघाने आता तरुणांना संधी देण्याचे ठरवले असून, अनेक प्रतिभावान खेळाडूंनीही अलीकडच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. रहाणेची दुलिप ट्रॉफी 2024 साठी देखील निवड झाली नव्हती. मात्र, दुखापतीतून सावरल्यानंतर तो घरचा संघ मुंबईकडून खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा-
“सर्वात वेगवान 50 पासून 500 विकेट्सपर्यंतचा विक्रम”, वाढदिवसादिनी जाणून घ्या दिग्गज फिरकीपटूचे खास रेकाॅर्ड्स
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे 5 भारतीय गोलंदाज, दिग्गज फलंदाजाचाही समावेश
हॉकीमध्ये ‘पंजा’ पूर्ण करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार, आज यजमान चीनविरुद्ध विजेतेपदाचा सामना