भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला दारूण पराभव पत्करावा लागला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहुण्या इंग्लंडने हा सामना जिंकत आघाडी घेतली आहे. शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) उभय संघांदरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी, सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने एका पत्रकाराला खडे बोल सुनावले.
रहाणेने पत्रकाराला सुनावले
भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतातर्फे उपकर्णधार अजिंक्य रहाणेने प्रश्नांची उत्तरे दिली. एका पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला की, “कर्णधार विराट कोहलीच्या म्हणण्यानुसार, मागील सामन्यात खेळाडूंची देहबोली बरोबर नव्हती. दोन मोठे विजय मिळून आलेला संघ अचानक असा कसा ढेपाळला ? कर्णधार बदलामुळे असे झाले का ?”
या प्रश्नाचे उत्तर देताना रहाणे म्हणाला, “खेळात तसे होत असते याचा अर्थ हा नाही की, कर्णधार बदलामुळे असे झाले आहे. विराट आमचा कर्णधार आहे आणि तोच राहिल. तुम्ही यामध्ये जर काही मसाला शोधत असाल तर, तो तुम्हाला मिळणार नाही.”
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात २-१ अशा फरकाने पराभूत करण्याची किमया करून दाखवली होती. मात्र, विराटच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला मोठा पराभव पत्करावा लागल्याने, विराटच्या कर्णधारपदाच्या शैलीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
शनिवारपासून सुरु होईल दुसरी कसोटी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) खेळला जाईल. पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने पिछाडीवर पडलेला भारतीय संघ या सामन्याद्वारे मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
पहिल्या सामन्यातील निराशाजनक कामगिरी विसरून भारताच्या सर्व खेळाडूंना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील भारताचे आव्हान टिकवून ठेवायचे असेल तर, आपल्या क्षमतेनुसार खेळ दाखवावा लागेल. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून भारतीय संघासोबत असलेला, मात्र अंतिम अकरामध्ये संधी मिळत नसलेला कुलदीप यादव या सामन्याद्वारे पुनरागमन करू शकतो. तसेच, डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम याला देखील संघाबाहेर केले जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
कट रचला! रुटचा गेम खल्लास, ‘या’ भारतीय खेळाडूने सांगितला रुटला तंबूत धाडायचा फाॅर्मुला
एकाच वनडे सामन्यात नाबाद २३२ धावा अन् ५ बळी घेणारी ‘फ्युचर सुपरस्टार’