आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सर्व संघांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी आपल्या रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल , ऍरॉन फिंच यांसारख्या खेळाडूंना संघांनी मुक्त केले असल्याने आगामी आयपीएल लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आयपीएल लिलावापूर्वीच कोणता खेळाडू कोणत्या संघात सहभागी होणार?, याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी मोठे भाकीत केले असून त्यांच्या मते मॅक्सवेल आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून सलामीवीराच्या भूमिकेत दिसू शकतो.
आकाश चोप्रा आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले, “मागील काही वर्षात चेन्नईने विदेशी सलामीवीरांवर विश्वास दाखवला आहे. माझ्यामते चेन्नई संघ ग्लेन मॅक्सवेल बाबत विचार करत आहे. चेन्नईकडे ऑफ स्पिनरची कमतरता असून आयपीएल लिलावामध्ये ऑफ स्पिनर सहजपणे मिळणार नाहीत. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेल चेन्नईकडून सलामीवीरा सोबतच ऑफ स्पिन गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो.”
तसेच पुढे आकाश चोप्रा यांनी स्पष्ट केले की, चेन्नई संघ ग्लेन मॅक्सवेलबरोबर जेसन रॉय, स्टीव स्मिथ व ऍरॉन फिंचवर देखील मोठा डाव खेळू शकतात.
ग्लेन मॅक्सवेल गतवर्षी ठरला फ्लॉप
ग्लेन मॅक्सवेल गतवर्षी किंग्स इलेव्हन पंजाब चे प्रतिनिधित्त्व करताना सपशेल फ्लॉप ठरला होता. त्यामुळे यावर्षी पंजाब संघाने त्याला रिलीज केले आहे. आयपीएल २०२०मध्ये त्याने एकूण १३ सामने खेळताना १०८ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या ३२ इतकी राहिली होती.
पहिल्यांदाच चेन्नई संघ नाही झाला क्वालिफाय
मागील हंगामात आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई संघ प्लेऑफ मध्ये क्वालिफाय होऊ शकला नाही. त्यामुळे यावर्षी चेन्नई संघाकडून चाहत्यांना उत्तम कामगिरिची अपेक्षा असणार आहे. चेन्नईने यावेळी अनेक खेळाडूंना संघातून बाहेर केल्यामुळे त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात रक्कम आहे. आता हे बघणे उत्सुकतेचे ठरले आहे की, चेन्नई संघ कोणत्या रणनीतीसह लिलावात उतरेल?.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रिस्बेन कसोटीवेळी ‘या’ व्यक्तीने भारतातून केली होती मदत; शार्दुलने केला उलगडा
एकेकाळी ड्रेसिंग रूममध्ये बसून ढसाढसा रडणारा इंग्लंडचा खेळाडू करू शकतो टीम इंडियाला चितपट!






