इंग्लंड संघाचा डाव 407 धावांवर संपला आहे. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात 180 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. इंग्लंडकडून हॅरी ब्रूक (Harry Brook & Jemi Smith) आणि जेमी स्मिथ यांनी शतके झळकावली, पण खालच्या फळीतले फलंदाज अपयशी ठरले. भारतीय संघासाठी मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) 6 विकेट्स घेतल्या. तसेच आकाशदीपने (Aakash Deep) चमकदार कामगिरी करत एकूण 4 खेळाडू बाद केले. भारताने पहिल्या डावात 587 धावांचा डोंगर उभा केला होता. त्या प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली.
दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघात नव्हता, तरीही भारताला गोलंदाजीत जोरदार सुरुवात मिळाली. आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची अर्धी टीम फक्त 84 धावांवर माघारी परतली. मागच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या बेन डकेटला (Ben Duckket) आकाशदीपने खातेही उघडू दिलं नाही, तर ऑली पोपही शून्यावर बाद झाला. जो रूट (Jo Root) डाव सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच सिराजने त्याला 22 धावांवर बाद केले.
त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या 84/5 अशी होती. मात्र, इथून हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी डाव सावरला. या दोघांनी 303 धावांची भक्कम भागीदारी केली. एकीकडे हॅरी ब्रूकने 158 धावा केल्या, तर दुसरीकडे जेमी स्मिथ फक्त 16 धावांनी द्विशतक गाठण्यात अपयशी ठरला. स्मिथने 184 धावांची खेळी केली. इंग्लंडने एकवेळ 5 बाद 387 अशी मजबूत स्थिती गाठली होती, पण त्यानंतर अवघ्या 21 धावांत त्यांच्या उरलेल्या 5 विकेटही कोसळल्या. इंग्लंडच्या शेवटच्या 3 फलंदाजांना खाते उघडता आले नाही.
भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे पाहिलं, तर मोहम्मद सिराजने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. त्याने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमध्येही 5 विकेट घेण्याची मोठी कामगिरी केली आहे. त्याच्या पाठोपाठ आकाशदीपने एकूण 4 खेळाडू बाद केले.





