देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची पहिली फेरी सध्या खेळवली जात आहे. सोमवारी (८ नोव्हेंबर) प्लेट गटातील सामना मणिपूर विरुद्ध विदर्भ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात विदर्भाचा अष्टपैलू खेळाडू अक्षय कर्णेवार याने एक अविश्वसनीय स्पेल टाकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. हा विक्रम भविष्यात मोडला जाण्याची देखील शक्यता अत्यंत कमी आहे.
अक्षयची शानदार कामगिरी
दोन वर्षांपूर्वी दोन्ही हाताने गोलंदाजी करून प्रसिद्धीझोतात आलेला विदर्भाचा फिरकीपटू अक्षय कर्णेवार याने मणिपूर विरुद्धच्या सामन्यात चार षटके गोलंदाजी करताना दोन बळी मिळवले. यातील अविश्वसनीय गोष्ट म्हणजे त्याने आपल्या चार षटकांत एकही धाव दिली नाही. त्याचा इकॉनॉमी रेट शून्य होता. अशी कामगिरी क्रिकेट इतिहासात आजवर कोणत्याही गोलंदाजाने केली नाही. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरने चार षटके टाकताना दोन निर्धाव षटके टाकत केवळ दोन धावा देऊन दोन बळी मिळवले होते.
विदर्भाचा दणदणीत विजय
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१-२०२२ प्लेट गट सामन्यात विदर्भाने मणिपूरविरुद्ध २० षटकात एकूण २२२ धावा केल्या. विदर्भासाठी जितेश शर्माने ७१ आणि अपूर्व वानखेडेने १६ चेंडूत ४९ धावांची तुफानी खेळी करत संघाची धावसंख्या २०० च्या पुढे नेली. डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मणिपूरचा संघ ५५ धावा करून सर्वबाद झाला. विदर्भासाठी आदित्य ठाकरे, अथर्व तायडे आणि अक्षय कर्णेवार यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, त्यात अक्षयचा चार षटकांचा विशेष विक्रम नोंदवला गेला.
दोन्ही हाताने करतो गोलंदाजी
अक्षय कर्णेवारने तीन वर्षांपूर्वी बोर्ड प्रेसिडेंट संघाकडून खेळताना आपले कौशल्य जगाला दाखवून दिले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने दोन्ही हातांनी गोलंदाजी केलेली. अक्षयची दोन्ही हातांनी केलेली गोलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस हादरला आणि म्हणाला की हे एक अद्भुत कौशल्य आहे. क्रिकेटच्या मैदानात असे कौशल्य मी यापूर्वी पाहिले नव्हते.






