काल पासून सुरु झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी पहिल्या फेरीत चांगली कामगिरी करताना दिमाखात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
आज या स्पर्धेची दुसरी फेरी रंगणार आहे. त्यामुळे काल पहिल्या फेरीत विजय मिळवलेले पीव्ही सिंधू, किदांबी श्रीकांत, एचएस प्रणॉय यांचे एकेरीचे तर प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी यांचे मिश्र दुहेरीचे आणि सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे पुरुष दुहेरीचे सामने रंगणार आहेत.
या स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी जरी काल चांगली कामगिरी केली असली तरी भारताची फुलराणी सायना नेहवालला मात्र पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागल्याने या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. तिला काल अग्रमानांकित ताइ त्झू यिंगने पराभूत केले.
तसेच काल पहिल्या फेरीतच साई प्रणितलाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याला कोरियाच्या सॉन वॅन होने पराभूत केले. तर दुहेरी लढतींमध्ये अश्विनी पोनप्पा- सिक्की रेड्डी आणि मेघना जक्कापुडी – पुर्विशा राम ह्या महिला दुहेरीचे जोड्यांना आणि मनू अत्री आणि सुमित रेड्डी ही पुरुष दुहेरीचे जोडी यांनाही काल पराभव स्वीकारावा लागला आहे.
अशा होणार आजच्या भारतीय बॅडमिंटनपटूंच्या दुसऱ्या फेरीतील लढती
पीव्ही सिंधू विरुद्ध निचांव जिंदापोल (महिला एकेरी)
एच एस प्रणॉय विरुद्ध टॉमी सुगियार्तो (पुरुष एकेरी)
किदांबी श्रीकांत विरुद्ध हुआंग युक्सिंग (पुरुष एकेरी)
प्रणव जेरी चोप्रा – सिक्की रेड्डी विरुद्ध वँग यियु – हुआंग डोंगपिंग (मिश्र दुहेरी)
सात्विक साईराज – चिराग शेट्टी विरुद्ध मेथियास बोए – कार्स्ट्रन मॉगेन्सन (पुरुष दुहेरी)