---Advertisement---

MPL 2025: कोण आहेत एमपीएल 2025 साठी सर्व संघांचे कर्णधार? ऋतुराजच्या अनुपस्थितीत ‌या खेळाडूच्या खांद्यावर जबाबदारी

On: शुक्रवार, मे 30, 2025 7:03 PM
---Advertisement---

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्या नियोजनाने होत असलेली ही स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी खेळली जाईल. एमपीएल 2023 व एमपीएल 2024 यशस्वी ठरल्यानंतर सर्वांना तिसऱ्या हंगामाचे वेध लागले आहेत. स्पर्धा सुरू होण्यासाठी आता चार दिवसांचा अवधी शिल्लक असताना, आपण सर्व संघांच्या कर्णधारांविषयी जाणून घेऊया.

सौरभ नवले (Saurabh Nawale)- छत्रपती संभाजी किंग्स संघ निष्कासित झाल्यानंतर त्या संघाची जागा सातारा वॉरियर्स या संघाने घेतली. आपल्या पहिल्या हंगामासाठी त्यांनी नेतृत्वाची धुरा यष्टीरक्षक सौरभ नवले याच्या खांद्यावर दिली आहे. सौरभ यापूर्वी छत्रपती संभाजी किंग्स संघाचा उपकर्णधार होता. त्याच्यासोबतच यावेळी सातारा संघाचा उपकर्णधार पवन शहा असेल. पहिल्याच वर्षी एमपीएल ट्रॉफी जिंकण्याचा मनोदय या दोघांनीही बोलून दाखवला आहे.

ऋषभ राठोड (Rushabh Rathod)- अष्टपैलू ऋषभ राठोड हा सलग तिसऱ्या वर्षी रायगड रॉयल्स संघाचा भाग आहे. तोच सलग दुसऱ्या वर्षी रायगड संघाचे नेतृत्व करेल. मागील दोन हंगामात रायगड संघाला तितकी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, एमपीएल 2025 लिलावात अनेक उत्कृष्ट खेळाडू त्यांनी आपल्या ताफ्यात सामील केले आहेत. त्यामुळे यावर्षी रायगड चमकदार कामगिरी करताना दिसू शकतो.

अझीम काझी (Azim Kazi)- एमपीएलच्या पहिल्या दोन हंगामाचे विजेतेपद पटकावण्यात रत्नागिरी जेट्स संघाला यश आले आहे. अनेक अनुभवी खेळाडू या संघात असताना अष्टपैलू अझीम काझी याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याने खेळाडू व कर्णधार या दोन्ही नात्याने ही जबाबदारी पार पाडताना आपल्या संघाला आतापर्यंत अजिंक्य ठेवले आहे. तिसऱ्या वर्षे देखील त्याच्याकडून संघाला विजेतेपदाची अपेक्षा आहे. त्यामुळे या वर्षी देखील काझी हाच रत्नागिरी संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल.

यश क्षीरसागर (Yash Kshirsagar)- स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ असलेल्या पुणेरी बाप्पा संघाला अद्याप अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार तसेच भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड या संघाचे नेतृत्व करतो. मात्र, एमपीएल 2025 च्या साखळी फेरीसाठी ऋतुराज उपलब्ध नसेल. त्याच्या जागी सलामीवीर यश क्षीरसागर हा संघाचे नेतृत्व करणार आहे. यश मागील तीन वर्षांपासून संघाचा नियमित खेळाडू असून, संघाच्या निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग दिसतो. त्याच्या व्यतिरिक्त सुरज शिंदे, मुर्तझा ट्रंकवाला व नौशाद शेख असे मोठा अनुभव असलेले खेळाडू देखील संघाचा भाग आहेत.

प्रशांत सोलंकी (Prashant Solanki)- मागील वर्षी मुंबई क्रिकेटला सोडून महाराष्ट्र क्रिकेटमध्ये सामील झालेला लेगस्पिनर प्रशांत सोलंकी सलग दुसऱ्यांदा ईगल नाशिक टायटन्स संघाचे नेतृत्व करेल. त्याच्या नेतृत्वात नाशिक संघाने पहिल्याच वर्षी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. एमपीएल 2024 जिंकण्यात थोडक्यात आलेले अपयश भरून काढण्याचा प्रयत्न प्रशांत करताना दिसेल.

राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi)- आयपीएलमध्ये मोठे नाव कमावलेला तसेच महाराष्ट्र वरिष्ठ संघाचे नेतृत्व केलेला राहुल त्रिपाठी दुसऱ्यांदा पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाची जबाबदारी वाहताना दिसेल. राहुलच्या नेतृत्वात कोल्हापूरने एमपीएल 2024 मध्ये तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतलेली. सलग दोन वर्ष थोडक्यात विजेतेपदाने हुलकावणी दिल्याने यंदाही कसर भरून काढत ट्रॉफी उंचावण्याचा कोल्हापूर संघाचा मनोदय असेल.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या स्पर्धेचे आयोजन करत आहे. पुण्यापासून जवळच असलेल्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 4 जून ते 22 जून या 20 दिवसांच्या कालावधीत ही स्पर्धा खेळली जाईल. एमसीए प्रथमच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील आयोजित करते आहे. या दोन्ही स्पर्धां JioHotstar या ओटीपी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहेत. तर, Star Sports 2 या टीव्ही चॅनेलवर घरबसल्या सामने पाहता येतील. एमसीएने सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---