आयपीएलमध्ये नेहमीच अनेक विक्रम होतात आणि मोडलेही जातात. मात्र आयपीएलमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरने केलेला असा एक विक्रम आहे जो आत्तापर्यंत 11 वर्षात कोणालाही मोडता आला नव्हता. परंतू शनिवारी(6 एप्रिल) मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जोसेफ अल्झारीने अखेर तो विक्रम मोडीत काढला आहे.
जोसेफने शनिवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात मुंबईकडून 3.4 षटके गोलंदाजी करताना 12 धावा देत 6 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो आता आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा गोलंदाज ठरला आहे.
याआधी हा विक्रम तन्वीरच्या नावावर होता. तन्वीरने आयपीएलच्या पहिल्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 4 मे 2008 ला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात 4 षटकात 14 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
2016मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळणारा ऍडम झम्पा तन्वीरच्या या विक्रमाच्या जवळपास पाहोचला होता. त्याने 10 मे 2016 ला सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध 4 षटकात 19 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. पण तो धावांच्या तुलनेत तन्वीरच्या मागे पडला.
पण अखेर शनिवारी मुंबई इंडियन्सच्या जोसेफने 11 वर्षांपूर्वीचा तन्वीरचा हा विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे हा जोसेफचा पहिलाच आयपीएलमधील सामना होता.
शनिवारी झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 136 धावा केल्या होत्या आणि हैद्राबाद समोर 137 धावांचे आव्हान ठेवले होते. हैद्राबाद हे आव्हान सहज पार करेल असे वाटत असतानाच मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत हैद्राबादला 17.4 षटकातच 96 सर्वबाद केले आणि 40 धावांनी विजय मिळवला.
आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारे गोलंदाज –
6 विकेट्स, 12 धावा – जोसेफ अल्झारी (मुंबई इंडियन्स)
6 विकेट्स, 14 धावा – सोहेल तन्वीर (राजस्थान रॉयल्स)
6 विकेट्स, 19 धावा – ऍडम झम्पा(रायझिंग पुणे सुपरजायंट्स)