मुंबई:-अंकुर स्पोर्टस्, श्रीराम संघ, विजय स्पोर्टस् (ठाणे), ओम् पिंपळेश्वर यांच्या साखळीतील पहिल्या विजयाने अमरहिंद मंडळाच्या राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेला प्रारंभ झाला. दादर, गोखले रोड(प.) येथील मंडळाच्या पटांगणातील मॅट वर “स्व. उमेश शेणॉय स्मृती चषक राज्यस्तरीय” स्पर्धेच्या क गटातील पहिल्या साखळी सामन्यात मुंबई शहराच्या अंकुर स्पोर्टस् ने उपनगराच्या जॉली स्पोर्टस् चे आव्हान ४७-३८ असे परतवून लावले. सुरुवात आक्रमक करीत जॉलीने पहिला लोण देत २गुणांची आघाडी घेतली. त्याला प्रतिउत्तर देत अंकुरने देखील लोण देत तोडीस तोड उत्तर देत विश्रांतीपर्यन्त २४-२१ अशी आगेकूच केली. विश्रांतीनंतर आणखी एक लोण देत विजयावर शिक्कामोर्तब केले. अंकूरच्या विजयात सुशांत साईलने २३ चढाया करीत १४ गुण मिळविले. त्यातील ४ बोनस गुण होते. ४वेळा त्याची पकड झाली. अभिमन्यू पाटीलने १६ चढायात २बोनस व ११ झटापटीत असे १३गुण कमविले. त्यांना सिद्धेश तटकरे, सुनील साईल यांनी बचाव भक्कम राखत उत्तम साथ दिली. जॉली कडून रजत सिंग, विजय जाधव, प्रशांत माने यांनी कडवी लढत दिली.
पालघरच्या श्रीराम संघाने ई गटात मुंबईच्या गोलफादेवीचा प्रतिकार ४३-३५ असा मोडून काढला. पूर्वार्धात अत्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात १६-१५ अशी श्रीरामकडे आघाडी होती. उत्तरार्धात मात्र जोरदार मुसंडी मारत श्रीरामाने गोलफादेवी वर दोन लोण देत विजय प्राप्त केला. श्रीरामच्या प्रतीक जाधव, नीरज सरोज यांनी धारदार चढाया करीत प्रतिस्पर्ध्यांचा बचाव खिळखिळा केला. त्यांना सौरभ खताळे उत्कृष्ट पकडीत करीत छान साथ दिली. गोलफादेवीच्या सिद्धेश पिंगळे, धनंजय सरोज, तुषार दुडये यांचा खेळ उत्तरार्धात कमी पडला. मुंबईच्या ओम् पिंपळेश्वरने ब गटात पुण्याच्या बलाढ्य बाबुराव चांदेरेला ४५-४३ असे रोखत उपस्थितांना आश्र्चर्य चकित केले. पहिल्या डावात १९-११ अशी आघाडी घेणाऱ्या चांदेरे फाऊंडेशनला दुसऱ्या डावातील अतिसंयम नडला. शेवटच्या क्षणापर्यंत ३गुणांची आघाडी चांदेरे संघाकडे होती. शेवटच्या चढाईत एक गुण दिला असता तरी चांदेरे संघ जिंकला असता. पिंपळेश्वरच्या सौरभ जाधवने सामन्याच्या शेवटच्या चढाईत शिलकी ३गडी टिपत लोणचे २ व ते ३ असे एकूण ५ गुण मिळवून देत २ गुणांच्या निसटत्या फरकाने विजय साकारला. पिंपळेश्वरच्या विजयात सौरभला शुभम साटम, चेतन गावकर यांच्या चढाई पकडिची उत्कृष्ट साथ लाभली. तेजस काळभोर, अजित चौहान यांचा अति आत्मविश्वास त्यांना पराभवाच्या गर्तेत घेऊन गेला.
ठाण्याच्या विजय स्पोर्टस् ने अ गटात मुंबईच्या जय दत्तगुरुचा ४६-२८ असा पराभव केला. मध्यांतराला १८-१४ अशी आघाडी घेणाऱ्या विजयने नंतर मात्र आपला खेळ गतिमान करीत १८गुणांच्या फरकाने सामना आपल्या बाजूने झुकविला. विघ्नेश चौधरी, प्रतीक पाटील यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अविष्कार सावे,ओमकार पाटील यांनी जय दत्तगुरु कडून पूर्वार्धात उत्कृष्ट लढत दिली, पण पूर्वार्धात त्यांचा सुर हरपला. अन्य निकाल लायन्स स्पोर्टस् वि. वि. श्री. विठ्ठल(५७-३१), ओवळी क्रीडा मंडळ वि. वि. जय भारत (३२-२९). या स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे माजी कबड्डी संघनायक रंजन पडते यांच्या हस्ते झाले. तदप्रसंगी श्रीमती शेणॉय, अरुण देशपांडे, मिनानाथ धानजी(शिवछत्रपती पुरस्कार), स्पर्धानिरीक्षक शरद कालंगण आदी मान्यवर उपस्थित होते. (Amarhind Mandal – Dadar, Organized Self Umesh Shenoy Memorial Cup State Level Kabaddi Tournament -2024.)
महत्वाच्या बातम्या –
मोठ्या भावाला आधी मारला खणखणीत षटकार, पुढे मिठी मारत इरफानने असे केले सेलीब्रेशन
T20 वर्ल्डकपसाठी 15 शिलेदार फिक्स? शतकी खेळी केल्यानंतर स्वतः रोहितकडून मिळाले संकेत






