हैदराबाद, ९ मार्च : हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) मधील दुसऱ्या उपांत्य फेरीचा पहिला लेग सामना कमालीचा चुरशीचा झाला. हिरो आयएसएलच्या यंदाच्या पर्वातील अप्रतिम बचाव असलेले दोन संघ हैदराबाद एफसी आणि एटीके मोहन बागान एकमेकांसमोर होते. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा असूनही गतविजेत्या हैदराबाद एफसीला गोल करता आला नाही. एटीके मोहन बागानने अविश्वसनीय खेळ करून दाखवला. विशेषतः दोन्ही संघांचे गोलरक्षक आज उजवे ठरले. विशाल कैथ व गुरमीत सिंग या दोघांनी सुरेख गोल अडवले. एटीके मोहन बागानचे ७ ऑन टार्गेट प्रयत्न हैदराबादचा गोलरक्षक गुरमीतने रोखले, तर मोहन बागानचा गोलरक्षक विशालने ३ ऑन टार्गेट रोखले. एटीके मोहन बागान किंचित वरचढ राहिले आणि त्यांचे दोन सोपे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने ही लढत गोल शून्य राहिली. आता १३ मार्चला कोलकाता येथे दोन्ही संघ पुन्हा भिडतील.
हिरो आयएसएलच्या मागील पर्वात उभय संघ जेव्हा उपांत्य फेरीत पोहोचले होते, तेव्हा हैदराबादने ३-२ अशा गोलसरासरीने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. घरच्या मैदानावर त्यांनी ३-१ असा विजय मिळवला होता. मुंबई सिटी एफसीला काल घरच्या मैदानावर सेमी फायनल लेग १ मध्ये बंगळुरू एफसीकडून हार मानावी लागली होती. त्यामुळे आज हैदराबाद एफसी त्यांच्या घरच्या मैदानावर थोडे सांभाळून खेळताना दिसले. ७व्या मिनिटाला बोर्हा हरेराने हालिचरण नर्झरीच्या पासवर सुरेख प्रयत्न केला, परंतु हैदराबादला यश मिळाले नाही. ११व्या मिनिटाला नर्झरी, जोएल चिनीझी यांनी दमदार खेळ करताना हैदराबादची खाते उघडलेच होते, परंतु गोलरक्षक विशाल कैथने अप्रतिम बचाव केला. ३ मिनिटानंतर नर्झरीच्या आणखी एका सुरेख पासने हरेराला गोल करण्याची सोपी संधी निर्माण करून दिली. हरेरा शॉट घेणार तितक्यात एटीके मोहन बागानच्या सुभाषिश बोसने दमदार बचाव केला.
हैदराबादकडून सातत्याने आक्रमण होत राहिले आणि मोहन बागानचा बचाव तितकाच भक्कम राहिला. २५व्या मिनिटाला नर्झरीचा लाँग रेंजवरून आलेला प्रयत्न गोलजाळीत जाण्यापासून बचावपटू सुभाषिशने रोखला. २६व्या मिनिटाला काऊंटर अटॅकवर मनवीर सिंगच्या क्रॉसवर लिस्टन कोलासोने गोल करण्याची संधी गमावली. मोहन बागानचा खेळ हळुहळू बहरताना दिसला आणि ३३ व्या मिनिटाला त्यांच्याकडून पहिला ऑन टार्गेट प्रयत्न झाला. तो हैदराबादचा गोलरक्षक गुरमीत सिंगने सहज रोखला. ३८व्या मिनिटाला मोहन बागानच्या तोंडाशी घास आला होता. दिमित्री पेट्राटोसने फ्री किकवर दिलेला पास सुभाषिशने हेडरद्वारे योग्य दिशेने पास केला आणि प्रितम कोटाने तो गोलजाळीत पाठवला होता. पण, गोलखांब्याला लागून चेंडू माघारी परतला अन् त्यानंतर कोटालचा दुसरा प्रयत्नही अपयशी ठरला. मोहन बागानसाठी ही सर्वात सोपी संधी होती.
पहिल्या हाफमध्ये हैदराबादकडून ८ प्रयत्न ( २ ऑन टार्गेट) झाले, तर मोहन बागानने ३ ( १ ऑन टार्गेट) प्रयत्न झाले. पण, दोन्ही संघांना गोलशून्य बरोबरीत समाधानी राहावे लागले. मध्यंतरानंतर मोहन बागानने खेळातील सातत्य कायम राखताना ५२व्या मिनिटाला गोल करण्याच्या पुन्हा एकदा जवळ पोहोचले होते. हैदराबादच्या बचावपटूंची चूक महागात पडली असती. आशिष रायने ऑन टार्गेट प्रयत्न मारला, परंतु गोलरक्षक गुरमीत सिंगने तो रोखला अन् हैदराबादच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला. ५५व्या मिनिटाला हैदराबादच्या मोहम्मद यासिरचा ऑन टार्गेट प्रयत्न पोस्टला लागून अयशस्वी ठरला. ६१व्या मिनिटाला ह्युगो बौमोस, पेट्राटोस सारखे खेळाडू पेनल्टी क्षेत्रात असूनही मनवीर सिंगने मोहन बागानला आघाडी मिळवून देण्याची संधी गमावली. मनवीरच्या या प्रयत्नांवर सहकारी नाराज दिसले. मोहन बागानचा हा सामन्यातील दुसरा सोपा चान्स होता. मनवीरचा ऑन टार्गेट प्रयत्न गुरमीतने रोखला.
सामना अखेरच्या टप्प्यात जसजसा जात होता तशी चुरस अधिक वाढताना दिसली. हैदराबादकडून अचानक आक्रमक खेळ होऊ लागला, परंतु मोहन बागानचा बचाव यासाठी खांद्याला खांदा लावून उभाच होता. दोन्ही संघांकडून दर्जेदार खेळ पाहायला मिळाला आणि दोन्ही गोलरक्षकांनी आपापल्या संघासाठी अप्रतिम बचाव केले. विशाल कैथने पहिल्या हाफमध्ये केलेले दोन बचाव मोहन बागासाठी महत्त्वाचे ठरले, परंतु तेच दुसरीकडे हैदराबाद एफसीच्या गुरमीत सिंगने ६ ऑन टार्गेट प्रयत्न हाणून पाडले. मोहन बागानचा गोलरक्षक विशाल कैथने यंदाच्या पर्वात ११ क्लीन शीट ( प्रतिस्पर्धीला एकही गोल करू न दिला) राखली आणि यासह त्याने गुरमीत संधूच्या २०१९-२०सालच्या विक्रमाची बरोबरी केली. ९०+५ व्या मिनिटाल पेट्राटोसचा ऑन टार्गेट प्रयत्न गुरमीतने रोखला अन् सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
निकाल : हैदराबाद एफसी गोलशून्य बरोबरी वि. एटीके मोहन बागान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इथे-तिथे, यहां-वहां, फक्त धोनीचीच हवा! कट्टर फॅनने लग्नाच्या पत्रिकेवर छापला माहीचा फोटो, पाहिला का?
‘लोक म्हणतात, संजू देवाचं गिफ्ट आहे, पण वास्तवात तो…’, माजी दिग्गजाची सॅमसनच्या चाहत्यांना चपराक