वेलिंगटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज(3 फेब्रुवारी) पाचवा वनडे सामना वेस्टपॅक स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्वबाद 252 धावा केल्या.
या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली होती. भारताने 18 धावांवरच पहिल्या 4 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर अंबाती रायडू आणि विजय शंकर यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला.
मात्र रायडू 90 धावांवर असताना मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे तो न्यूझीलंडमध्ये वनडेत नाईंटीज(90 ते 99 धावांदरम्यान) मध्ये बाद होणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.
या सामन्यात रायडूने 90 धावा करताना 8 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच त्याने शंकर 45 धावांवर बाद झाल्यानंतर केदार जाधव बरोबर सहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली.
यानंतर शेवटच्या काही षटकात फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पंड्याने तुफानी फलंदाजी करताना 5 षटकार आणि 2 चौकारांसह 45 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला 250 धावांचा टप्पा पार करता आला.
महत्त्वाच्या बातम्या-
–सामना खेळत असतानाच या क्रिकेटपटूला मातृशोक
–या कारणामुळे भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे वेळापत्रक बदलणार
–या वेगवान गोलंदाजांनी केली आहे रोहित शर्माची सर्वाधिक वेळा शिकार