युएईमध्ये खेळल्या गेलेला आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाने जिंकला आहे. या सामन्यात एमएस धोनीच्या सीएसकेने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा 5 गडी राखून पराभव केला आहे. सीएसके संघातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणजे अंबाती रायडू.तो दहा महिन्यांनंतर क्रिकेट सामना खेळत होता.
अंबाती रायडू सामन्यात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा चेन्नई सुपर किंग्ज संघाने 6 धावांत 2 गडी गमावले होते. संघावर दबाव होता. 163 धावांचे लक्ष्य होते. अनुभवी फलंदाज रायडूला ठाऊक होते की जर फलंदाजी काळजीपूर्वक केली तर लक्ष गाठणे कठीण काम नाही. पण केवळ टी-20 मध्ये खेळपट्टीवर टिकून सामना जिंकता येत नाही. वारंवार आक्रमण करण्याचीसुद्धा गरज असते. अंबाती रायडू याने ही जबाबदारी स्वीकारली.
रायडू तोच खेळाडू आहे ज्याला जानेवारी 2019 पर्यंत भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हटले जात होते. पण मार्च 2019 मध्ये कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्यावर अविश्वास दाखवला व वनडे विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान दिले नाही.
काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रायडूने दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज फाफ डु प्लेसीसबरोबर 115 धावांची भागीदारी केली. या 115 धावांपैकी 71 धावा एकट्या रायडूच्या आहेत. डु प्लेसीस एका टोकाला सावकाश खेळत होता आणि दुसर्या टोकाला रायडू मुंबई संघाच्या गोलंदाजांचे आक्रमण नष्ट करत होता. त्याने सामन्यात सर्वाधिक धावाच केल्या नाही तर चौकार आणि षटकार मारण्यातही तो आघाडीवर होता. रायडूने 48 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार लगावले.
निवृत्त झाल्यामुळे हलक्यात घेऊ नका
34 वर्षीय अंबाती रायडू बाद झाला तेव्हा चेन्नई संघाचा विजय निश्चित झाला होता. या डावातून रायडूने संदेश दिला की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये हलक्या पद्धतीने घेण्याची चूक करू नये.
निराश होऊन घेतली होती निवृत्ती
2019 मधील वनडे विश्वचषकात त्याला संधी मिळाली नाही. तसेय या वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरची निवड झाली होती. त्यामुळे निराश होऊन रायडूने निवृत्ती घेतली होती. पण त्यानंतर त्याने निवृत्तीतून माघार घेतली.