मंगळवारी(30 डिसेंबर) भारतीय क्रिकेट संघाने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव केला. याबरोबरच 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या या विजयात कर्णधार अजिंक्य रहाणेने मोठे योगदान दिले. त्याने या सामन्यात 112 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीचे सर्वांनीच कौतुक केले. मात्र अनेकांना रहाणेबाबत एक गोष्ट माहित नाही ती म्हणजे बरोबर सात वर्षांपूर्वी आलेल्या एका एसएमएसने रहाणेच्या कारकिर्दीला मोठे वळण दिले होते.
ही गोष्ट आहे 2013 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील. या दौऱ्यातील डर्बन येथे रहाणे त्याच्या कारकिर्दीतील तिसराच कसोटी सामना खेळत होता. हा सामना देखील बॉक्सिंग डे कसोटी सामना होता. या सामन्यात रहाणेने पहिल्या डावात नाबाद 51 धावा केल्या होत्या. तर सामन्याच्या 5 व्या दिवशी 30 डिसेंबर, 2013 ला दुसऱ्या डावात 96 धावांवर रहाणेला विकेट गमवावी लागली होती. त्याचं पहिलं कसोटी शतक केवळ 4 धावांनी हुकलं होतं. त्या सामन्यात भारताला तब्बल 10 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे तो प्रचंड निराश होता.
त्याचवेळी त्याला एक एसएमएस आला. तोही डर्बनपासून हजारे किलोमीटर दूर असलेल्या मुंबई शहरातून. त्या एसएमएसमध्ये लिहिले होते की ‘तुला आता समजले असेल की कसोटी क्रिकेट काय आहे. शतकाचे महत्त्व काय आहे.’
या एसएमएसला रहाणेने लगेचच उत्तर पाठवले, ‘सर, मी शतकासाठी तुम्हाला फार वाट पाहायला लावणार नाही.’ रहाणेला आलेल्या त्या एसएमएसने त्याच्या कारकिर्दीत मोठा बदल घडवला. त्याच्या आयुष्यावरही त्याचा प्रभाव पडला. त्यानंतर मात्र रहाणेने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याने भारतातच नाही, तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अशा देशांत शतके झळकावली. लॉर्ड्सच्या मैदानापासून ते मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानात त्याने शतकं करण्याची कामगिरी केली.
रहाणेच्या कारकिर्दीत एवढा मोठा बदल घडवून आणणारा एसएमएस पाठवला होता तो दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने.
विशेष म्हणजे या घटनेनंतर सात वर्षांनी रहाणेने सचिनच्या विक्रमाशी बरोबरीही केली. रहाणे हा मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी शतक करणारा सचिननंतरचा दुसराच भारतीय कर्णधार ठरला.
रहाणेने या देशात केली कसोटी शतके –
रहाणेने आत्तापर्यंत 12 कसोटी शतके केली आहेत. त्यातील 4 शतकं त्याने भारतात केली आहेत. तर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि कॅरेबियन बेटं (वेस्ट इंडिज) या देशांमध्ये प्रत्येकी 2 शतकं रहाणेने केली आहे. तसेच त्याने इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये प्रत्येकी एक शतक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जर रोहितचे तिसऱ्या कसोटीत पुनरागमन झाले तर ‘या’ खेळाडूला बसावे लागेल बाहेर
साल २०२० केएल राहुलसाठी ठरले खास, विराट, रोहितलाही टाकले मागे