माउंट मोंगनूई| न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्ध बे ओव्हल स्टेडियमवर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत बुधवारी (३० डिसेंबर) १०१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत कोणताही निकाल लागण्याची शक्यता होती. मात्र अखेर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अखेरच्या सत्रात चांगली गोलंदाजी करत ३७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला २७१ धावांवर रोखले.
या सामन्यातील सामनावीराचा मानकरी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ठरला. त्याने या सामन्यात पहिल्या डावात १२९ धावांची शतकी खेळी केली होती. तसेच दुसऱ्या डावात २१ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
वॅगनरने पायाचा पंजा फ्रॅक्चर असतानाही केली गोलंदाजी –
न्यूझीलंडचा गोलंदाज निल वॅगनर या सामन्यात खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याला सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (२७ डिसेंबर) फलंदाजीदरम्यान पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा एक यॉर्कर उजव्या पंज्याला लागला. त्यामुळे पाकिस्तानच्या पहिल्या डावाच्या सुरुवातीच्या षटकात तो गोलंदाजी करू शकला नाही. पण दुसऱ्या दिवसाखेर त्याने तीन षटके गोलंदाजी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर वॅगनरच्या पंज्याचा स्कॅन करण्यात आला, ज्यामध्ये त्याचा पंजा फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. मात्र त्याची दुखापत जास्त गंभीर नसल्याने डॉक्टरांनी त्याला गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला.
त्यामुळे त्याने पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातही गोलंदाजी केली. या सामन्यात त्याने एकूण ४ विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडचा पहिला डाव –
न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १५५ षटकात सर्वबाद ४३१ धावा केल्या. त्यांच्याकडून विलियम्सनने २९७ चेंडूत १२९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि १ षटकार मारला. त्याचबरोबर त्याने रॉस टेलरसह १२० धावांची शतकी भागीदारीही केली. टेलरने ७० धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त हेन्री निकोल्स आणि बीजे वॉटलिंग यांनीही या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. तर काईल जेमिसनने ३२ धावांची खेळी केली.
पाकिस्तानकडून शाहिन शहा आफ्रिदीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर यासिर शहाने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद अब्बास, फाहिम अश्रफ आणि नसीम शहाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
पाकिस्तानचा पहिला डाव –
पाकिस्तानच्या पहिल्या डावाची फार निराशाजनक सुरुवात झाली. त्यांनी ८० धावांवरच ६ विकेट्स गमावल्या होत्या. त्याचदरम्यान मोहम्मद रिझवान आणि फाहिम अश्रफने पाकिस्तानचा डाव सांभाळला. त्यांनी ७ व्या विकेटसाठी १०७ धावांची शतकी भागीदारी केली. पण रिझवान ७१ धावांवर धावबाद झाल्याने ही भागीदारी तुटली. तर त्यानंतर काही वेळातच अश्रफ ९१ धावांवर बाद झाला. त्यामुळे अखेर पाकिस्तानचा हा डाव २३९ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे न्यूझीलंडने १९२ धावांची आघाडी घेतली.
न्यूझीलंडकडून या डावात जेमिसनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट आणि निल वॅगनरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडचा दुसरा डाव –
पहिल्या डावात मोठी आघाडी मिळालेल्या न्यूझीलंडने दुसरा डाव ५ बाद १८० धावांवर घोषित केला. या डावात सलामीवीर टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडेलने अर्धशतके केली. लॅथमने ५३ आणि ब्लंडेलने ६४ धावांची खेळी केली. तसेच विलियम्सनने २१ धावा केल्या. पाकिस्तानकडून या डावात नसीमने सर्वाधिक ३ आणि मोहम्मद अब्बासने १ विकेट घेतली.
पाकिस्तानचा दुसरा डाव –
पाकिस्तानची पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. त्यांनी ७५ धावांवरच ४ विकेट्स गमावल्या. पण ३७३ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अखेर फवाद आलम आणि कर्णधार रिझवानची जोडी जमली. या दोघांनी ५ व्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी केली आणि पाकिस्तानच्या आशा जागृत केल्या. या सामन्यातील पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात त्यांना ३६ षटकात १५६ धावांची गरज होती. मात्र शेवटच्या सत्रात पाकिस्तानने ६ विकेट्स झटपट गमावल्या. त्यामुळे अखेर सामना न्यूझीलंडने खिशात घातला.
पाकिस्तानकडून या डावात फवाद आलमने २६९ चेंडूत १०२ धावांची शतकी खेळी केली. तसेच रिझवानने ६० धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिशेल सँटेनर, टिम साऊथी, ट्रेंट बोल्ट, निल वॅगनर आणि काईल जेमिसनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
त्यादिवशी आलेला ‘तो’ मेसेज ठरला अजिंक्य रहाणेच्या आयुष्यातील टर्निंग पाँइंट!
जर रोहितचे तिसऱ्या कसोटीत पुनरागमन झाले तर ‘या’ खेळाडूला बसावे लागेल बाहेर