चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या शतक महोत्सवा निमित्ताने आयोजित चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंकुर स्पोर्ट्स क्लब संघाने विजेतेपद पटकावले. अंकुरचा सुशांत साहिल मालिकावीर ठरला.
विजय क्लब मुंबई शहर विरुद्ध अंकुर स्पोर्ट्स क्लब यांच्यात चिंतामणी चषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला. अंकुर स्पोर्ट्स क्लबने २९-२५ असा सामना जिंकत विजेतेपद पटकावले. अंकुरकडून सुशांत साहिल व किशन बोटे यांनी उत्कृष्ट खेळ केला.
अंतिम विजयी संघास रोख रुपये ३५,०००/- व चिंतामणी चषक देऊन अंकुर स्पोर्ट्सचा गौरविण्यात आले. तर अंतिम उपविजयी विजय क्लब संघास रोख रूपये २५,०००/- व चिंतामणी चषक देऊन गौरविण्यात आले. उपांत्य उपविजयी जॉली व जय भारत संघास ७,५००/- रोख रुपये व चिंतामणी चषक मिळाला.
अंकुर स्पोर्ट्स क्लबचा सुशांत साहिलची स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडु म्हणून निवड करण्यात आली. सुशांतला रोख रुपये ५,००० व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. विजय क्लबचा अजिंक्य कापरेला उत्कृष्ट चढाईपटू तर अंकुरचा किसन बोटेला उत्कृष्ट पकडपटू म्हणून रोख रुपये ३,००० /- देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू म्हणून विजय क्लबच्या राहुल शिरोडकर, लक्षवेधी खेळाडू म्हणून अंकुरच्या अभिजित दोरगुडे तर अभिषेक नर प्रेक्षकांच्या पसंतीचा खेळाडू ठरला.
त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत विजत क्लबने जय भारत संघावर ३७-३६ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. शेवटच्या मिनिटाला अजिंक्य कापरेच्या रेडला मिळाले २ गुण निर्णायक ठरले. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत अंकुर स्पोर्ट्सने मुंबई उपनगरच्या जॉली क्रीडा मंडळाचा ३४-२९ पराभव केला.
पारितोषिक वितरण समारंभ नगरसेवक श्री रमाकांत रहाटे, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानदसचिव श्री.सुधीर साळवी, अध्यक्ष श्री.बाळासाहेब कांबळे, शिवसेना भायखळा विधानसभा संघटक श्री.विजय लिपारे, श्री.पराग विठ्ठल चव्हाण, मुंबई कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह श्री.विश्वास मोरे, कार्याध्यक्ष श्री.मनोहर इंदुलकर, श्री.अनिल घाटे, चिं.सा.उ. मंडळाचे अध्यक्ष श्री. उमेश नाईक, मानद सचिव श्री.वासुदेव सावंत, कोषाध्यक्ष श्री.अतुल केरकर, कार्याध्यक्ष श्री.भालचंद्र परब यांच्या उपस्थितीत पार पडला.आमदार श्री.अजय चौधरी यांनी विशेष उपस्थिती दर्शवून सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता विद्याधर घाडी, सुनील नवले, महेश पेडणेकर, रोहन मेहेर,अक्षय मिराशी,चारुदत्त लाड, गणेश गावडे, शशिकांत हांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.