भारतीय क्रिकेट परिषद अर्थात बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. याच बीसीसीआयचा जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळाच दरारा आहे. अशा या संघटनेकडून खेळणाऱ्या खेळाडूंनाही जगात तसाच मान मिळतो. आजकाल भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणारे क्रिकेटपटू हे चिक्कार मानधन घेतात. काहींना तर निवृत्तीनंतर अन्य काही करण्याची गरज पडावी नाही इतकी ते चांगली कमाई करतात. याचबरोबर आयपीएल व जाहीराती यातूनही क्रिकेटपटू पैसे कमावतात. विराट कोहली किंवा रोहित शर्मासारख्या खेळाडूंना मोठे खेळाडू समजले जाते व ते चांगले कमाईही देखील करतात. ते लोकप्रियता, कामगिरी व कमाई अशा तिनही गोष्टींत अव्वल आहे. असे असले तरी बीसीसीआयकडून दिलेल्या मानधनाचा विचार केला तर भारतीय संघांच्या प्रशिक्षकाचे मानधन हे विराट-रोहितपेक्षाही जास्त आहे, हे सांगितल्यावर अनेकांना विश्वास बसणार नाही. चला तर मंडळी, मग आज आपला ५९वा वाढदिवस साजरा करत असलेल्या रवी शास्त्रींच्या मानधनाबद्दल जाणून घेऊयात.
सर्वाधिक कमाई करणारे प्रशिक्षक-
रवी शास्त्री यांनी २०१७ मध्ये अनिल कुंबळे यांच्या जागी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची सुत्र हातात घेतली. तेव्हापासून गेली ४ वर्ष ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. ईएसपीएन क्रिकइंफोच्या एका रिपोर्टनुसार, रवी शास्त्री हे जगातील सर्वात महागडे क्रिकेट प्रशिक्षक आहेत. त्यांना वर्षाला १.१७ मिलियन डॉलर इतके मानधन दिले जाते. इतके मानधन जगातील कुठल्याच क्रिकेट प्रशिक्षकाला दिले जात नाही.
जगातील इतर क्रिकेट प्रशिक्षकांबद्दल बोलायचं झालं तर, विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांना वर्षाला ०.५५ मिलियन डॉलर इतके मानधन दिले जाते. तसेच इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांना वर्षाला ०.५२ मिलियन डॉलर इतके मानधन दिले जाते. याचा अर्थ असा की, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या प्रशिक्षकांपेक्षा रवी शास्त्री यांचे मानधन दुपटीपेक्षा ही जास्त आहे. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड देशाचे क्रिकेट बोर्ड हे जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्डापैकी एक आहेत.
स्मिथ-रुट मात्र शास्त्रींनाही भारी-
विराट कोहलीला बीसीसीआय वर्षाला १ मिलियन डॉलर इतके मानधन देते. परंतु भारतीय संघाचे प्रशिक्षक त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. रवी शास्त्री यांना वर्षाकाठी बीसीसीआय १.१७ मिलियन डॉलर इतके मानधन दिले जाते. असे असले तरीही ऑस्ट्रेलिया व इंग्लंडचे खेळाडू मात्र मानधनाच्या बाबतीत भारतीय गुरु-शिष्याच्या बरेच पुढे आहेत. ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला वर्षाला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड १.४७ मिलियन डॉलर इतके मानधन देते तर, इंग्लिश कर्णधार जो रूट याला इंग्लंड क्रिकेट बोर्ड १.२७ मिलियन डॉलर इतके मानधन देते. म्हणजेच विराट कोहलीचे मानधन स्टीव्ह स्मिथ आणि जो रुट पेक्षा ही कमी आहे तसेच प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही स्मिथ व रुटपेक्षा कमी मानधन मिळते.
हेही वाचा-
–कट्टर विरोधक पाकिस्तानचा धुव्वा उडवत रवी शास्त्री बनले होते चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन, जिंकली होती ऑडी १००
–या हसीन अभिनेत्रींच्या प्रेमात होते रवी शास्त्री, पण त्यांची प्रेमकहाणी मात्र...
–टीम इंडियातील हा अष्टपैलू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ; रवी शास्त्रींनी केलं तोंडभरुन कौतुक






