भारतातील देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम काही दिवसात सुरू होणार आहे. त्याची सुरुवात टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने होईल. ४ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रत्येक राज्य संघटनांनी त्यांच्या संघांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. ओडिशाने स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला असून, त्यामध्ये चक्क एका राष्ट्रीय संघाच्या कर्णधाराला स्थान देण्यात आले आहे.
या संघाचा राष्ट्रीय कर्णधार खेळणार ओडिशासाठी
हाँगकाँगसाठी १८ वनडे आणि २० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला व संघाचा कर्णधार राहिलेला अंशुमन रथ या स्पर्धेसाठी ओडिसा संघाचा भाग असेल. त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. त्याने भारतासाठी खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नियमावलीनुसार त्याने आपला कूलिंग पिरेड पूर्ण केला असून तो आता भारतात प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळू शकतो. रथ याने मागे आपण भारतासाठी खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगितले होते.
इंस्टाग्रामवर केली पोस्ट
ओडिशा संघात निवड झाल्यानंतर अंशुमन खूप भावनिक झाला. त्याने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट देखील लिहिली. त्याने ओडिशाच्या जर्सीचे चित्र पोस्ट केले आणि लिहिले, ‘चार वर्षे आणि सहा महिन्यांनंतर, हा एक लांबचा प्रवास आहे. या कठीण काळात जे माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांचे मी आभार मानू इच्छितो. जेव्हा इतरांनी संधी नाकारली तेव्हा मला संधी दिल्याबद्दल क्रिकेट ओडिशाचे मी आभार मानू इच्छितो. मला मैदानावर माझे सर्वोत्तम योगदान द्यायचे आहे. आता मागे वळून न पाहता आपण नेहमी पुढे जायचे आहे.’
या संघासाठी खेळण्याचा केला होता प्रयत्न
ओडिशापूर्वी अंशुमनचा प्रयत्न माजी रणजी विजेता विदर्भासाठी खेळण्याचा होता. त्यासाठी या डावखुऱ्या फलंदाजाने खूप प्रयत्नही केले होते पण यश मिळाले नाही. तो नागपुरात क्लब क्रिकेटही खेळलेला. २०२०-२०२१ हंगामासाठी त्याला विदर्भाच्या संघात निवडले गेले नव्हते. यानंतर त्याने ओडिशाशी चर्चा केली ज्यामध्ये त्याला यश मिळाले.
भारताविरुद्ध केलेली शानदार खेळी
युएई येथे झालेल्या २०१८ च्या आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या शानदार खेळीमुळे अंशुमान प्रसिद्ध झाला होता. या सामन्यात भारताने हाँगकाँगसमोर २८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अंशुमनने निजाकत खानच्या साथीने डावाची सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी करून भारतीय संघाला घाम फोडला होता. मात्र, भारतीय संघाने पुनरागमन केले आणि सामना २६ धावांनी जिंकला. अंशुमनने ९७ चेंडूत ७३ धावांची खेळी खेळलेली. २०१९ मध्ये त्याने हाँगकाँगसाठी क्रिकेट खेळणे सोडले होते.






