---Advertisement---

भारत-इंग्लंड मालिकेला नाव दिलेले ‘ऍन्थनी डी मेलो’ आहेत तरी कोण?

On: मंगळवार, जानेवारी 26, 2021 11:30 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांचादरम्यान ५ फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अनुषंगाने या मालिकेचे महत्त्व खूपच वाढलेले दिसून येते. दोन्ही संघ चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या दोन स्थानांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतील. असे असतानाच या चार सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येक सामना हा उभय संघांसाठी ‘डू ऑर डाय’ होणार आहे.

आतापर्यंत इंग्लंड संघाला काही अपवाद वगळता भारतामध्ये तितकेसे यश लाभले नाही. मात्र, यावेळी अनुभवी आणि युवा खेळाडूंच्या उत्कृष्ट मिश्रणासह भारतात दाखल झालेल्या इंग्लड संघाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. दोन्ही संघांमध्ये होणारी ही मालिका ‘ऍन्थनी डी मेलो ट्रॉफी’ या नावाने ओळखली जाते. परंतु, हे ऍन्थनी डी मेलो आहेत तरी कोण ? या क्रिकेटप्रेमींना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

‘ऍन्थनी डी मेलो ट्रॉफी’ व ‘पतौडी ट्रॉफी’ काय आहे फरक ?

सन १९५१ पासून भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान भारतात होणाऱ्या कसोटी मालिकांना ‘ऍन्थनी डी मेलो ट्रॉफी’ म्हणण्यास सुरुवात झाली. ज्यावेळी इंग्लंडमध्ये उभय संघ कसोटी मालिका खेळतात त्यावेळी मात्र, याच ट्रॉफीचे नामकरण ‘पतौडी ट्रॉफी’ असे होते. भारताचे नेतृत्व करणारे इफ्तिखार अली खान पतौडी व त्यांचेच सुपुत्र मन्सूर अली खान पतौडी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी दिली जाते. भारत व इंग्लंड यांच्यात सन १९३२ पासून कसोटी क्रिकेट खेळले जाते. परंतु, पतौडी ट्रॉफी हे नाव २००७ सालापासून देण्यास सुरुवात झाली.

कोण होते ऍन्थनी डी मेलो?

भारत व इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठेच्या कसोटी मालिकेला नाव देण्याइतपत हे ऍन्थनी डी मेलो नक्की कोण होते ? हा प्रश्न पडणे सहाजिक आहे. ऍन्थनी डी मेलो हे भारतीय क्रिकेट प्रशासनातील एक आदरणीय नाव म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतात क्रिकेटचे रोपटे लावण्याचा पहिला प्रयत्न ज्या ज्या लोकांनी केला त्यामधील एक नाव होते ऍन्थनी डी मेलो यांचे. एक हौशी संघ ते विश्वविजेता भारतीय संघ असा प्रवास करणाऱ्या भारतीय क्रिकेटचे जनक डी मेलो यांना म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

सन १९०० मध्ये सध्या पाकिस्तानात असलेल्या कराची येथे जन्मलेले डी मेलो पहिल्यापासूनच क्रिकेटबद्दल कमालीचे उत्साही होते. काही काळ क्रिकेटपटू म्हणून खेळलेल्या डी मेलो यांनी अगदी कमी वयातच भारतभर क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केली. सध्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची पायाभरणी करण्याचे काम ऍन्थनी डी मेलो, महाराजा ऑफ  पटियाला, एमसीसी क्रिकेट संघाचे कर्णधार आर्तुर गिलीयन व ग्रॅन्ट गोवन यांनी दिल्लीच्या रोशनारा क्लब येथे केले. भारतातील विविध प्रांतातील क्रिकेट संघाची मोट बांधण्याचे कार्य हे सर्व लोक करत होते.

गोवन व डी मेलो या जोडीने भारतात कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका व एमसीसी संघांना त्यांच्या त्यांच्या देशात जाऊन आमंत्रित केले. दुर्दैवाने त्यांच्या या भेटींना यश आले नाही. अखेरीस डिसेंबर १०२८ मध्ये दिल्लीच्या रोशनारा क्लब येथे बीसीसीआयची औपचारिक स्थापना झाली. सर ग्रॅन्ट गोवन हे बीसीसीआयचे पहिले अध्यक्ष तर डी मेलो पहिले सचिव बनले. १९२९ मध्ये याच दोघांनी इंपिरियल क्रिकेट परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. रणजी ट्रॉफी ही भारतातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू करण्याचा मान देखील डी मेलो यांच्याकडेच जातो.

भारतच नव्हे तर जगातील सर्वात जुन्या क्रिकेट संघटनांपैकी एक असलेल्या क्रिकेट क्लब ऑफ इंडिया म्हणजेच सीसीआयच्या स्थापनेतही डी मेलो यांचा सिंहाचा वाटा आहे. बीसीसीआयचे मुख्यालय दिल्लीवरून मुंबई हलवणे, सीसीआयची स्थापना करण्यासाठी जागेची उपलब्धता नसताना मुंबईचे  गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांचे मन वळवून कमी दरात जागा पदरात पाडून घेण्याची श्रेय डी मेलो यांना जाते. डी मेलो यांनी सन १९२८ ते १९३८ अशी सलग दहा वर्ष बीसीसीआयचे सचिवपद आणि १९४६ ते १९५१ अशी पाच वर्ष बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले.

भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी दिले योगदान

डी मेलो हे बॉम्बे प्रांतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि १९५० च्या बॉम्बे येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे प्रमुख संयोजक होते. १९५१ मध्ये ते दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्षही होते. ग्वाल्हेर आणि उत्तर भारत परिवहन प्रणालीचे सरव्यवस्थापक म्हणून त्यांनी दिल्लीच्या वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यास मदत केली. त्यांनी जुम्ना व्हॅली रेल आणि रोड ट्रान्सपोर्ट कंपनीचेही नेतृत्व केले.

हुकूमशहा डी मेलो

डी मेलोने नंतरच्या काळात कायम वादात राहिले. बीसीसीआय अध्यक्षपदाच्या त्यांच्या काळाला टाईम्स ऑफ इंडियाने  ‘हुकूमशाही” म्हटलेले. ८ मे १९५१  रोजी दिल्लीच्या इम्पीरियल हॉटेलमध्ये झालेल्या बोर्डाच्या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ बंगालच्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जे. सी. मुखर्जी यांच्या विजयानंतर संपुष्टात आला. १९४९ मध्ये जेव्हा डी मेलो यांनी भारतीय कर्णधार लाला अमरनाथ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तेव्हा याच ‘बंगाल लॉबी’ने अमरनाथ यांना जोरदार समर्थन दिलेले. १९५२ मध्ये डी मेलो यांनी बीसीसीआय अध्यक्षपदासाठी आणखी एक प्रयत्न केला. परंतु, संख्याबळ न जुळल्याने त्यांनी माघार घेतली.

क्रिकेट प्रशासनातून बाजूला झाल्यानंतर लवकरच त्यांना कर्करोगाचे निदान झाले. यातच त्यांचा १९६१ साली अंत झाला. त्यांनी लिहिलेले ‘इंडियन स्पोर्ट्स’ हे पुस्तक १९५९ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. क्रिकेट आणि खेळांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या ऍन्थनी डी मेलो यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही.

महत्वाच्या बातम्या:

भारताविरुद्धच्या दौऱ्यातून संघाबाहेर काढल्याने बेअरिस्टोची घेतली डीकेवेलाने फिरकी, म्हणाला.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : गतविजेत्या कर्नाटकाचा पराभव, पंजाबचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश

IND Vs ENG: विराट कोहलीसाठी डोकेदुखी; अश्विन, सुंदर आणि कुलदीपमध्ये कुणाची करावी निवड? 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---