पुणे। प्रो कबड्डीमधील पुणेरी पलटण संघाने प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमासाठी भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार अनुप कुमारची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे 6 व्या मोसमात खेळाडू म्हणून निवृत्त झालेला अनुप कुमार आता प्रशिक्षकाच्या भुमीकेत दिसणार आहे.
अनुप कुमारची कबड्डीमध्ये खेळाडू म्हणून शानदार कारकिर्द राहिली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्ये 2006 ला दक्षिण आशियाई खेळातून पदार्पण केले होते. या स्पर्धेत भारताने सुवर्णपदक मिळवले होते.
तसेच त्याने भारतीय संघाचे नेतृत्वही केले. त्याच्या नेतृत्वाखाली 2010 आणि 2014 च्या एशियन गेम्समध्ये भारताने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याचबरोबर 2016 ला कबड्डी विश्वचषकाचेही विजेतेपद मिळवले.
अनुप कुमारला भारतीय सरकारडून 2012 मध्ये त्याच्या कबड्डी खेळातील योगदानाबद्दल अर्जून पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
नवीन प्रशिक्षक नियुक्तीबद्दल बोलताना पुणेरी पलटणचे सीइओ कैलाश कांडपाल म्हणाले, ‘प्रो कबड्डीमध्ये अनुप अनुभवी आणि शांत स्वभावासाठी ओळखला जातो. आम्ही पुढील नव्या मोसमात नवीन रणनिती आखण्यासाठी त्याच्या कौशल्यावर विश्वास ठेवतो.’
तसेच अनुप कुमार म्हणाला, ‘कबड्डी हे माझे पहिले प्रेम आहे आणि मी या खेळाला सर्वकाही दिले आहे. एक प्रशिक्षक म्हणून हा माझा पहिला कार्यकाळ असेल आणि मी आमच्या संघाचे कौशल्य, फिटनेस, आणि मानसिकता चांगली बनवण्यामध्ये लक्ष्य केंद्रीत करेल. मी विवो प्रोकबड्डीच्या सातव्या मोसमात पुणेरी पलटणबरोबर प्रशिक्षक म्हणून काम करण्यास उत्सुक आहे.’