---Advertisement---

कर्नाटकच्या अनुराधाने रचलाय इतिहास, श्रीलंकाच्या लसिथ मलिंगाचा विश्वविक्रम केलाय नावावर

On: बुधवार, ऑगस्ट 26, 2020 8:20 PM
---Advertisement---

नुकतीच जर्मनी महिला क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रिया महिला संघात ५ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. या मालिकेत जर्मनी महिला संघाने ५-० ने एकहाती विजय मिळवला. या मालिकेत जर्मनी महिला संघाची कर्णधार अनुराधा डोडाबल्लापुर हिने सलग ४ चेंडूत ४ विकेट्स घेत विश्वविक्रम केला आहे. तिच्या या कामगिरीमुळे ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

ऑस्ट्रिया महिला संघाविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात अनुराधाने ३ षटके टाकत केवळ १ धाव घेत ५ विकेट्स चटकावण्याचा कारनामा केला आहे. दरम्यान तिने सलग ४ चेंडूत ऑस्ट्रिया संघाच्या ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासह ती आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

अनुराधापुर्वी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १९ महिला क्रिकेटपटूंनी हॅट्रीक घेण्याचा पराक्रम केला आहे. पण, कोणतीही महिला क्रिकेटपटू टी२०त सलग ४ चेंडूत ४ विकेट्स घेऊ शकली नाही.

एवढेच नव्हे तर, अनुराधाने तिच्या टी२०तील १ धाव देत ५ विकेट्स घेण्याचा विक्रम करत श्रीलंकाचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला आहे. मलिंगाने गतवर्षीच्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० सामन्यात ६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. यासह तो टी२०त सर्वोत्तम कामगिरी करणारा पहिला कर्णधार बनला होता.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचणारी अनुराधा ही तिच्या नावावरुन भारतीय असल्यासारखे सर्वांना वाटत असेल. तर, हो. अनुराधा ही मुळात भारतातील कर्नाटक राज्यातली आहे. तिने १९ वर्षांखालील कर्नाटक महिला संघाकडून क्रिकेटदेखील खेळले आहे. Anuradha Doddaballapur Cricket Journey

आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या प्रवासाची कहानी सांगताना अनुराधा म्हणाली की, “मी १२ वर्षांची असताना कर्नाटक महिला खेळाडूंच्या सराव गटात सहभागी झाले होते. १९९८-९९मध्ये हा गट दिग्गज महिला क्रिकेटपटू शांता गोस्वामी आणि फलंदाज कल्पना वेकटचर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होता. तिथून माझी निवड १६ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात आणि नंतर १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात झाली.”

पण, त्यानंतर मेडिकल जेनेटिक्सचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनुराधाला यूकेला जावे लागले. जरी शिक्षणासाठी तिने भारत देश सोडला असला तरी ती क्रिकेट खेळायला विसरली नव्हती. यूकेमध्येही तिने न्यकासल काउंटी क्लबकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर ती नॉर्थबरलॅंड संघाकडून खेळली.

अनुराधा पुढे बोलताना म्हणाली की, “ती क्रिकेट आणि मेडिकल या दोन्हीपैकी एकाला निवडू शकत नव्हती. त्यामुळे तिला जेव्हा पीएचडी करण्यासाठी जर्मनीला जावे लागले, तेव्हा तिथेही तिने क्रिकेट खेळण्याचा पर्याय शोधला. जर्मनीत तिला सुरुवातीला फ्रँकफुट क्रिकेट क्लबकडून खेळायचे होते, पण त्या क्लबचा महिला संघ नव्हता. म्हणून तिने पुरुषांच्या क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळले. पुढे २०१५साली फ्रँकफुट महिला क्लबची स्थापना झाली. अशाप्रकारे ती कधीही क्रिकेटपासून दूर राहिली नाही.”

अखेर फेब्रुवारी २०२०मध्ये तिला जर्मनी महिला टी२० क्रिकेट संघात स्थान मिळाले. तेव्हापासून तिने ९ टी२० सामने खेळले आहेत. दरम्यान तिने १२३ धावा आणि ९ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. एवढेच नव्हे तर, ती संघाचे कर्णधारपददेखील सांभाळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---