---Advertisement---

अगदी धोनीसहित या दिग्गजांच्या नशीबात टी२०त कधीही नव्हती मॅन ऑफ द मॅच

On: बुधवार, ऑगस्ट 26, 2020 5:36 PM
---Advertisement---

क्रिकेट सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या कामगिरीला मोठे महत्त्व असते. त्याची कामगिरी सामनावीर पुरस्कार देताना लक्षात घेतली जात असते. साधारण जो खेळाडू त्याच्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो, त्याला हा पुरस्कार दिला जातो.

टी२० हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात छोटा प्रकार आहे. प्रत्येक सामन्यात केवळ २०-२० षटकांचा खेळ होत असल्याने खेळाडूंना मिळालेल्या वेळेत चांगली कामगिरी करुन दाखवण्याचा दबाव असतो. अशा वेळी महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार मिळतो.

पण असे काही खेळाडू आहेत ज्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत, तसेच त्यांनी टी२०मध्ये चांगली कामगिरीही केली आहे, मात्र त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. अशाच खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे –

एकही सामनावीर पुरस्कार न मिळवता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारे खेळाडू (Most T20Is in career without a Man of the Match award) – 

१. एमएस धोनी – ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारा कर्णधार आहे. तसेच तो भारताकडून रोहित शर्मानंतर सर्वाधिक सामनेे खेळणारा खेळाडू आहे. पण त्याला आत्तापर्यंत एकदाही सामनावीर पुरस्कार मिळालेला नाही.

त्याने निवृत्तीपर्यंत ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले. त्यात त्याने २ अर्धशतकांसह ३७.६० च्या सरासरीने १६१७ धावा केल्या आहेत. धोनीने २०१७ ला त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील सर्वोच्च ५६ धावांची खेळी केली होती.

२. दिनेश रामदिन – ७१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने – 

वेस्ट इंडिजचा प्रतिभाशाली यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदिनलाही त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत कधीही सामनावीर पुरस्कार मिळालेला नाही. फेब्रुवारी २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण केलेल्या रामदिनने आत्तापर्यंत ७१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.

यामध्ये त्याने १८.७० च्या सरीसरीने ६३६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १ अर्धशतकाचा समावेश आहे. हे अर्धशतक त्याने २०१४ ला वेलिंग्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध खेळताना केले होते. त्यावेळी त्याने नाबाद ५५ धावा केल्या होत्या.

३. असगर अफगाण – ६९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने 

अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाण(आधीचे नाव असगर स्टॅनिकझाई) अफगाणिस्तानकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा मोहम्मद नबी नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.

त्याने आत्तापर्यंत ६९ टी२० सामने अफगाणिस्ताकडून खेळले आहेत. पण त्याला यातील एकाही सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला नाही. त्याने २१.१५ च्या सरासरीने ३ अर्धशतकांसह १२४८ धावा केल्या आहेत. तसेच त्याने खेळलेल्या ६९ टी२० सामन्यांपैकी ४९ सामन्यात अफगाणिस्तानचे नेतृत्वही केले आहे.

४. विल्यम पोर्टरफिल्ड – ६१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने 

आयर्लंडचा प्रतिभाशाली सलामीवीर फलंदाज विल्यम पोर्टरफिल्डने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो आयर्लंडकडून टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. पण असे असले तरी त्याला एकदाही त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत सामनावीर पुरस्कार मिळालेला नाही.

त्याने आयर्लंडकडून ६१ टी२० सामने खेळताना ३ अर्धशतकांसह १०७९ धावा केल्या आहेत. त्यातील त्याने १६ फेब्रुवारीला २०१६ ला संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध केलेली ७२ धावांची खेळी ही त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावांची खेळी केली होती. पण या सामन्यात संयुक्त अरब अमिराती संघाने केवळ ५ धावांनी विजय मिळवला होता.

५. दिनेश चंडीमल – ५४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने

श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश चेंडिमलने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ४ अर्धशतके केली आहेत. मात्र एकदाही त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत सामनावीराचा पुरस्कार मिळालेला नाही.

त्याने श्रीलंकेकडून ५४ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने ४ अर्धशकांसह १८.६० च्या सरासरीने ८०० धावा केल्या आहेत. ५८ धावा ही त्याची आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील सर्वोच्च धावांची खेळी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---