आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सहावा सामना काल (24 सप्टेंबर) रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन संघादरम्यान खेळला गेला. सामन्यादरम्यान आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहलीने क्षेत्ररक्षण करताना दोन झेल सोडले व फलंदाजीतही तो लवकर बाद झाला.
या सामन्यात भारतीय क्रिकेट संघांचे माजी फलंदाज सुनील गावसकर समालोचन करत होते. विराटच्या खराब कामगिरीमुळे त्यांनी त्याची पत्नी अनुष्का शर्माचे नाव घेऊन टिप्पणी केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर गावसकर बरेच ट्रोल होत आहेत. काही लोकांनी त्यांना समालोचकांच्या पॅनलमधून बाहेर काढा असेही म्हटले आहे.
गावसकर गमतीने विराटबद्दल बोलतांना म्हणाले, “ त्याने लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काने फेकलेल्या चेंडूचाच सराव केला आहे.”
यावर आता अभिनेत्री अनुष्का शर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्का तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाली, “श्री. गावस्कर, तुम्ही जे बोलले ते चांगलं नव्हतं. पतीच्या वाईट प्रदर्शनामुळे त्याच्या पत्नीवर आरोप आरोप केले. तुम्ही असं का केल हे सांगू शकता का? मला माहिती आहे की समालोचन करताना कोणत्याही क्रिकेटपटूच्या वैयक्तिक जीवनाचा तुम्ही आदर केला आहे. तुम्हाला असे वाटत नाही का की माझाही आदर करणे आवश्यक आहे?
पुढे ती म्हणाली “मला खात्री आहे की काल रात्री माझ्या पतीच्या कामगिरीवर भाष्य करण्यासाठी तुमच्या मनात अनेक वाक्ये आणि शब्द आले असतील, किंवा माझ्या नावाचा उल्लेख केल्यामुळेच तुमच्या टिप्पणीला जास्त महत्व मिळत असेल. हे 2020 आहे आणि माझ्यासाठी अजूनही गोष्टी बदलल्या नाहीत. क्रिकेटमध्ये मला ओढणे आणि अशा प्रकारे एकतर्फी भाष्य करणे कधी थांबणार??”
“आदरणीय श्री. गावस्कर, तुम्ही एक महान क्रिकेटपटू आहात. तुमच्या नावाला क्रिकेटमध्ये उच्च स्थान आहे. जेव्हा तुम्ही माझं नाव घेऊन टिप्पणी केली तेव्हा मला कसे वाटले हेच मला सांगायचे होते.” असेही पुढे ती म्हणाली.