भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. बांगलादेश संघाने अलीकडेच दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा पराभव केला होता, त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे. अशातच या मालिकेपूर्वी बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने मोठे वक्तव्य केले आहे. भारतातील दोन्ही कसोटी सामने जिंकणे हे आमचे ध्येय असेल, असे तो म्हणाला आहे. तसेच विजयासाठी बांगलादेशचा संघ कोणता फॉर्मुला वापरणार आहे?, याचाही त्याने खुलासा केला आहे.
ढाकावरुन रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत नजमुल म्हणाला, “भारतातील ही एक आव्हानात्मक मालिका असेल. पण पाकिस्तान मालिकेने आम्हाला अतिरिक्त आत्मविश्वास दिला आहे. मला वाटते की आता संपूर्ण देशाला तो आत्मविश्वास आहे. प्रत्येक मालिका ही आमच्यासाठी एक संधी आहे. आम्हाला दोन्ही कसोटी जिंकायच्या आहेत पण आम्हाला आमच्या प्रक्रियेला चिकटून राहावे लागेल. आम्ही आमचे काम केले तर आम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात.”
‘रँकिंगमध्ये भारतीय संघ आमच्यापेक्षा पुढे’
बांगलादेशचा कर्णधार पुढे म्हणाला, “भारतीय संघ क्रमवारीत आमच्यापेक्षा खूप पुढे आहे पण आम्ही अलीकडे चांगला खेळ केला आहे. आम्हाला पाच दिवस चांगले खेळायचे आहे. ते आमचे लक्ष्य आहे. आम्हाला शेवटच्या सत्रात निकाल मिळवायचा आहे. कारण अखेरच्या सत्रात काहीही होऊ शकते. भारतात पहिला विजय मिळविणे ही एक संधी आहे, परंतु आम्ही जास्त पुढे विचार करू इच्छित नाही. हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”
‘आमच्या वेगवान गोलंदाजाना तेवढा अनुभव नाही’
नझमुल पुढे म्हणाला, “आमचे गोलंदाजी आक्रमण, फिरकी आणि वेगवान दोन्हीही चांगल्या स्थितीत आहेत. जरी आमच्या वेगवान गोलंदाजांना भारतीय वेगवान गोलंदाजांइतका अनुभव नसला तरी आमचे फिरकी आक्रमण त्यांच्या तुलनेचे आहे. ते कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करू शकतात. मी म्हणू शकतो की आमचे वेगवान गोलंदाज, फिरकीपटू आणि फलंदाज त्यांचे 100 टक्के देतील.”
तो म्हणाला, “मला वाटतं की जेव्हा आपण एक संघ म्हणून खेळू तेव्हाच आपण फरक करू शकतो. यात फक्त फिरकीपटूच नाही तर वेगवान गोलंदाज आणि फलंदाजही आहेत. संपूर्ण संघाला एकजुटीने खेळावे लागेल.”
हेही वाचा –
मुंबई इंडियन्सच्या फास्ट बॉलरची दुलीप ट्रॉफीत हवा! अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा गोलंदाज
VIDEO : युवा फलंदाजाचं दुर्दैव…असा विचित्र रनआऊट यापूर्वी कधीच पाहिला नसेल
जसप्रीत बुमराहकडे इतिहास रचण्याची संधी, केवळ 3 विकेट घेताच बनेल मोठा रेकॉर्ड!