हरियाणात जन्मलेला वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजनं दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात इतिहास रचला आहे. त्यानं इंडिया सी कडून खेळताना इंडिया बी विरुद्ध एका सामन्यात 8 बळी घेतले. अशी कामगिरी करणारा तो दुलीप ट्रॉफीच्या इतिहासातील केवळ तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.
कंबोजनं सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्यानं रविवारी आणखी 3 विकेट घेत इंडिया बी संघाचं कंबरडं मोडलं. दुलीप ट्रॉफीमध्ये अंशुल कंबोजपूर्वी फक्त देबाशिष मोहंती (10/46) आणि अशोक दिंडा (8/123) या दोनच वेगवान गोलंदाजांनी एका सामन्यात 8 विकेट घेतल्या होत्या.
कंबोजनं पहिल्या डावात नारायण जगदीसन (70) याला बाद केलं. यानंतर त्यानं मुशीर खान (1), सरफराज खान (16), रिंकू सिंह (6) आणि नितीश कुमार रेड्डी (2) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर दुसऱ्या डावात त्यानं राहुल चहर, नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांची विकेट घेतली. या सामन्यापूर्वी कंबोजनं त्याच्या शेवटच्या 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एका डावात तीनपेक्षा जास्त बळी घेतले नव्हते.
इंडिया बी विरुद्ध इंडिया सी यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. इंडिया सी ने आपल्या पहिल्या डावात 525 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देत इंडिया बी ने पहिल्या डावात 332 धावा केल्या. दुसऱ्या डावात इंडिया सी संघानं 4 गडी बाद 128 धावांवर डाव घोषित केला. मात्र निकाल न लागल्यानं सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
अंशुल कंबोजनं आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं होतं. त्यापूर्वी त्यानं केवळ 9 टी20 सामने खेळले होते. या वेगवान गोलंदाजानं मुंबईसाठी 3 सामने खेळत 2 बळी घेतले.
हेही वाचा –
नासिर हुसैन यांची ही कसली सर्वोत्तम एलेव्हन? संघात केवळ एकाच भारतीयाचा समावेश!
VIDEO : युवा फलंदाजाचं दुर्दैव…असा विचित्र रनआऊट यापूर्वी कधीच पाहिला नसेल
जसप्रीत बुमराहकडे इतिहास रचण्याची संधी, केवळ 3 विकेट घेताच बनेल मोठा रेकॉर्ड!