मेलबर्न विमानतळावर राडा! विराट कोहलीला राग अनावर; नेमकं काय घडलं?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर आता चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळला जाईल. या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे. मात्र येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याच्याशी संबंधित आहे.
वास्तविक, विराट कोहली मेलबर्न एअरपोर्टवर उतरताच त्याची एका महिला पत्रकारासोबत जोरदार बाचाबाची झाली. या कसोटी मालिकेत आधीच वाईट फार्मातून जात असलेल्या किंग कोहलीचा मेलबर्न विमानतळावर चॅनल 7 च्या पत्रकाराशी जोरदार वाद झाला. पत्रकारानं परवानगी न घेता फोटो काढल्यानं विराट कोहली चांगलाच संतापला होता. त्यामुळे हा वाद झाल्याचं बोललं जातंय.
विराट कोहली गुरुवारी ब्रिस्बेनहून मेलबर्नला पोहोचला. यावेळी विराट त्याच्या कुटुंबासह उपस्थित होता. मेलबर्न विमानतळावर चॅनल 7 च्या कॅमेरा पर्सननं कोहलीचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. यावर विराट कोहली चांगलाच संतापला आणि पत्रकारावर त्याचा ताबा सुटला. यावेळी पत्रकाराला फोटो काढायचा होता तेव्हा विराटनं कुटुंबियांसोबत फोटो काढण्यास नकार दिला.
त्यावर पत्रकारानं किंग कोहलीला प्रत्युत्तर देत विमानतळ सार्वजनिक मालमत्ता असल्याचे सांगितलं. यानंतर वातावरण चांगलंच तापलं आणि विराट कोहली मागे फिरला. तो चॅनल 7 च्या पत्रकाराला उद्देशून म्हणाला की, “मला माझ्या मुलांसोबत प्रायव्हसी हवी आहे. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही फोटो काढू शकत नाही.” हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून काही वेळातच ते सोशल मीडियावर व्हायरल झालं.
विराट त्याच्या कुटुंबाबाबत खूप संवेदनशील आहे. मुलगी वामिकाच्या जन्मानंतरही त्यानं सोशल मीडिया पोस्टमध्ये गोपनीयतेची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. याचा उल्लेख त्यानं अनेकदा केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहली आधीच फारसा फॉर्ममध्ये नाही. त्यानं पर्थ कसोटी सामन्यात निश्चितच शतक झळकावलं, पण याशिवाय उर्वरित डावात त्याला तितकी चांगली कामगिरी करता आलेली नाही. आता विराटच्या नजरा मेलबर्नमध्ये होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीकडे लागल्या आहेत. जिथे तो फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा –
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथी कसोटी मेलबर्नमध्ये, बाॅक्सिंग डे टेस्टमध्ये टीम इंडियाचा विक्रम कसा?
निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी अश्विन चेन्नईत पोहचला, घरी भावनिक स्वागत; पाहा VIDEO
‘अश्विन’ची निवृत्ती ही तर फक्त सुरुवात, आगामी काळात संघात मोठे बदल होणार