भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ खेळवली जात आहे. या लीगमध्ये भारतासह विदेशातील अनेक मोठमोठे क्रिकेटपटू सहभागी होतात. काही बड्या नावांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या काही परदेशी खेळाडूंना देखील या जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक टी२० लीगमध्ये संधी मिळते. यावर्षी मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेला दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याने आपला एक विदेशी संघसहकारी व त्याच्या जुळ्या भावासोबतचे एक छायाचित्र आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे.
अर्जुनने शेअर केले छायाचित्र
आयपीएल २०२१ साठी अर्जुन तेंडुलकर पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. त्याच्यासह दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सन यालादेखील मुंबई इंडियन्सने संधी दिली आहे. मार्कोचा जुळा भाऊ डूआन हादेखील सध्या मुंबई संघासोबत सराव करतो. अर्जुनने याच दोन्ही भावांसोबतचे आपले छायाचित्र इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. छायाचित्रात तिघांनीही मुंबई इंडियन्सचा लोगो असलेला एकसारखा टी शर्ट परिधान केला आहे.

अर्जुन खेळत आहे पहिली आयपीएल
अर्जुन तेंडुलकर प्रथमच आयपीएल खेळत आहे. फेब्रुवारी महिन्यात चेन्नई येथे झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला २० लाख रुपयांच्या किमतीत खरेदी केले होते. मुंबईने खेळलेल्या पहिल्या पाच सामन्यात त्याला अजून संधी मिळाली नाही. अर्जुन प्रामुख्याने डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तसेच, तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन मोठी फटकेबाजी देखील करू शकतो.
मार्कोने मुंबईसाठी केले पदार्पण
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नसतानाही मुंबई इंडियन्सने आयपीएल लिलावात मार्कोवर बोली लावत सर्वांना चकित केले होते. तसेच, पहिल्या दोन सामन्यात त्याला संघात स्थान दिले गेले. २० वर्षीय मार्को या दोन्ही सामन्यात प्रत्येकी एक बळी घेण्यात यशस्वी ठरला होता. मार्कोचा जुळा भाऊ डूआन हादेखील वेगवान गोलंदाज असून, या दोघा भावांनी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघासाठी नेट बॉलर म्हणून भूमिका पार पाडली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनची खोड काढणे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पडले होते महागात, चाहत्याने दिले होते असे उत्तर!






