भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारत श्रीलंका दौऱ्यावर 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जाहीर देखील झाला आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. तर भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) म्हणाला की, रोहित-विराटची कारकीर्द पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील.
अर्शदीप न्यूज एजन्सी आयएएनएसशी बोलताना म्हणाला की, “रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 क्रिकेटवर छाप सोडली आहे. त्यांचे योगदान खूप मोठे आहे. भारतासाठी त्यांनी केलेले कार्य पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील. रोहित भाईची विस्फोटक फलंदाजी आणि त्याच्या कर्णधारपदाने टी20 फॉरमॅटमध्ये नवी उर्जा निर्माण केली. तर विराट भाई आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने आणि उत्कृष्टतेमुळे जगभरातील क्रिकेटपटूंसाठी आदर्श ठरला आहे.”
पुढे बोलताना अर्शदीप म्हणाला, “विराट भाईची खेळाप्रती असलेली आवड, समर्पण आणि दबावाखाली कामगिरी करण्याची क्षमता याने माझ्यासह अनेक युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा दिली आहे. मोठ्या मंचावर यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे, हे त्यानं आम्हाला दाखवले आहे. त्याचे रेकॉर्ड स्वतः बोलतात. तो आता टी20 खेळत नसला तरी खेळावरील त्याचा प्रभाव आम्हाला मार्गदर्शन आणि प्रेरणा देत राहील.”
शेवटी अर्शदीप म्हणाला, “मला रोहित भाईच्या नेतृत्वात आवडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचे मैदानावरील शांत वागणे. तो नेहमीच आपल्या खेळाडूंना पाठिंबा देतो. त्यामुळे आम्हाला आमचा नैसर्गिक खेळ खेळण्याचा आत्मविश्वास मिळतो. त्याची खेळावरील क्षमता आणि खेळ समजण्याची पद्धत खरोखरच प्रेरणादायी आहे.”
झिम्बाब्वेविरुद्ध असलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी अर्शदीप सिंगला विश्रांती देण्यात आली होती. आता त्याची श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध भारत 3 टी20 आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी यापेक्षा अधिक काय करू”, मोहम्मद शमीचा टीम मॅनेजमेंटला सवाल; विश्वचषकात मिळाली नव्हती संधी
प्रशिक्षक बनताच गंभीरने काढला धोनीवरचा राग? टीम इंडियातून सीएसकेचे चौघे ‘क्लिन बोल्ड’, सोशल मीडियावर चर्चा
बाबर आझमला जगावर वर्चस्व गाजवायचे? गुपचूप करतोय कोहलीला काॅपी, पाहा VIDEO