भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. तेथे संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. प्रमुख खेळाडूंसह ४ राखीव खेळाडू देखील इंग्लंडला जात आहेत. यामध्ये गुजरातचा डावखुरा युवा वेगवान गोलंदाज अर्झन नागवासवाला याचा देखील समावेश आहे. या निवडीनंतर अर्झनने आपली प्रतिक्रिया दिली. तसेच आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत मार्गदर्शन केलेल्या खेळाडूंबाबतदेखील खुलासा केला.
मला विश्वास बसला नाही
देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व करणारा अर्झन नागवासवाला बावीस वर्षीय असून तो डावखुऱ्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना तो म्हटला, “प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास संघात निवड झाली आहे हे पचवणे माझ्यासाठी अवघड होते. या गोष्टीवर विश्वास बसण्यासाठी काही काळ जावा लागला. मी त्या सर्व खेळाडूंना भेटण्यासाठी उत्सुक आहे, ज्यांना मी आत्तापर्यंत केवळ टीव्हीवर पाहत आलो आहे. या सर्वांनी ऑस्ट्रेलियामध्ये व इंग्लंड विरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्यासोबत खेळण्याचा अनुभव शानदार असेल.”
बुमराहचे मानले आभार
अर्झनने आपल्याच वाद्याचा रहिवासी असलेल्या व भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे आभार मानले. तो म्हणाला, “बुमराह गुजरातचा असला तरी तो जास्त वेळ भारतीय संघासोबत असतो. मात्र, मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये असताना मी त्याच्याकडून भरपूर काही शिकलो. त्याने मला सांगितले होते की, शेन बाँड असो नाहीतर झहीर खान ज्यांच्याकडून शिकता येते त्या सर्वांकडून शिकत राहा. त्यानंतर ठरव तुला काय करायचे आहे. सध्या भारत अरुण सरांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय गोलंदाज दमदार कामगिरी करत आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासाठी मी उत्सुक आहे.”
इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या २० सदस्यीय भारतीय संघासोबत चार राखीव खेळाडूंना निवडले गेले आहे. यामध्ये बंगालचा सलामीवीर अभिमन्यु ईश्वरन, कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा व मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज आवेश खान यांच्यासह अर्झन नागवासवाला याचा समावेश केला गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एक वेळ अशी होती विनाकारणच रडायला यायचे, सानिया मिर्झाचा मोठा खुलासा
जाळ अन् धूर संगटच! टॅलेंटची खाण आहे ‘या’ क्रिकेटपटूची बायको; पटकावलाय मिस वर्ल्ड ऑस्ट्रेलियाचा किताब