भारताचे शेजारील राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानची राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत बिकट झाली आहे. याचा थेट परिणाम अफगाणिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर होताना दिसतोय. तालिबान सरकार अस्तित्वात आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये महिलांना क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. या मुद्द्यावरून ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड व ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अफगाणिस्तानसोबत क्रिकेट संबंध पूर्वीप्रमाणे ठेवायचे की नाही याबाबत विचार करण्यास सुरुवात केली असून, ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने याच मुद्द्यावरून अफगाणिस्तान क्रिकेटविषयी एक वादग्रस्त विधान केले होते. आता अफगाणिस्तानच्या संघाचा अनुभवी फलंदाज व कसोटी कर्णधार असगर अफगाण याने पेनला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलियाने दिली आहे चेतावणी
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान टी२० विश्वचषकानंतर एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र, तालिबानने महिला क्रिकेटला पाठिंबा न दिल्यास हा सामना न खेळण्याची चेतावणी ऑस्ट्रेलियाने दिली होती. याच बाबतीत एका स्थानिक रेडीओला दिलेल्या मुलाखतीत ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने म्हटले होते की,
“जे लोक आपल्या अर्ध्या लोकसंख्येला या खेळापासून परावृत्त ठेवतात त्यांना आयसीसी विश्वचषकात खेळण्याची परवानगी कशी देते? आगामी विश्वचषकात अनेक देश त्यांच्याविरुद्ध खेळायचे की नाही याबाबत विचार करतील.”
असगर अफगाणचा पलटवार
पेनने म्हटलेल्या विधानाचा समाचार घेताना अफगाणिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार असगर अफगाणने फेसबुक पोस्ट करत पेनला आरसा दाखवला. त्याने लिहिले,
‘मिस्टर पेन, अफगाणिस्तान संघाला केवळ याच नव्हेतर, आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये खेळण्याचा हक्क आहे. मला खात्री आहे की, आमचे खेळाडू आपल्या प्रतिभेला न्याय देतील. आम्ही अत्याधिक कष्ट व अनेक अडचणींमधून मार्ग काढत जगातील अव्वल १० संघांशी खांद्याला खांदा लावून भिडत आहोत.’
असगरने पेनवर सत्यस्थिती जाणून न घेता आरोप करण्याविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच, भविष्यात अशा प्रकारची वक्तव्य करताना काळजी घेण्यास सांगितले. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज दौलत जादरान यानेदेखील पेनला खडे बोल सुनावले.