ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात सध्या ऍशेस मालिकेचा दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना पिंक बॉल स्वरुपात होतो आहे. ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पहिल्या डावात मोठी धावसंख्या केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक जोस बटलर याने (Jos Buttler) दोन महत्वाचे झेल सोडले. बटलरच्या या प्रदर्शनानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एडम गिलक्रिस्ट याने बटलविषयी नाराजी व्यक्त केली आहे. याच बटलरने या सामन्यादरम्यान अप्रतिम झेल टिपत सर्वांचे लक्ष वेधले होते.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या गोलंदाजीवर सामन्याच्या पहिल्या दिवशी बटलरने ऑस्ट्रेलियाच्या मार्कस हॅरीसचा अप्रतिम झेल घेतला होता, यासाठी त्याचे सर्वानी कौतुक देखील केले होते. परंतु सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बटलरने दोन महत्वाचे झेल सोडले. हे दोन्ही झेल ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या क्रमांवार फलंदाजी करणाऱ्या मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याचे होते, जे सहज घेता येऊ शकले असते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या या निराशाजनक प्रदर्शनानंतर गिलक्रिस्टने याबाबत नाराजी व्यक्त केली.
एडम गिलक्रिस्ट म्हणाला की, “जोस बटलर एक चांगला खेळाडू आहे. परंतु त्याने दोन महत्वाचे झेल सोडले, जे संघासाठी धोकादायक ठरू शकतात. झेल सोडल्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूने शुक्रवारी खेळपट्टीवर शतक करत त्याच्या डावा संपवला.”
बटलरने जेव्हा लाबुशेनचा झेल सोडला, तेव्हा तो ९५ धावांवर फलंदाजी करत होता आणि त्याने ऑस्ट्रेलिया संघासाठी पहिल्या डावात ३०५ चेंडूत १०३ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ८ चौकारांचा समावेश आहे. लाबुशेनव्यतिरिक्त सलामीवीर डेविड वॉर्नरने ९५ आणि या सामन्यात कर्णधारपद सांभाळणाऱ्या स्टीव स्मिथने ९३ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
संघातील खेळाडूंच्या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १५०.४ षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर ४७३ धावा केल्या आणि डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ८.४ षटकांचा सामना केला आणि दोन विकेट्स गमावून १७ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रुट (५) आणि डेविड मलान (१) खेळपट्टीवर कायम आहेत. सलामीवीर हसिब हमीद (६) आणि रोरी बर्न्स (४) स्वत्तात तंबूत परतले.
महत्वाच्या बातम्या –
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय! पाकिस्तानला आधी पळपळ पळवलं, अगदी रडवलं आणि शेवटी हरवलंच
चप्पल, चार्जर, शेकर; ईशांतची सामानाने खचाखच भरलेली बॅग पाहून विराट म्हणे, ‘जो कोणी हिला घेऊन पळून…’
फलंदाज, कर्णधार ते गुरू; रोहितचं एनसीएमध्ये युवा शिलेदारांना मोलाचं मार्गदर्शन, फोटो व्हायरल