इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या ऍशेज मालिकेची (ashes series 2021-22) सुरुवात बुधवारी (८ डिसेंबर) झाली. पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने पहिल्या दिवसाच्या सुरुवातील नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा हा निर्णय ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. इंग्लंडचे फलंदाज पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरले. कर्णधार रुट (joe root) याने तर चाहत्यांची खूपच निराशा केली, तो शून्य धावा करून बाद झाला.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १२.४ षटकात आणि २९ धावांवर त्यांच्या पहिल्या आणि महत्वाच्या चार विकेट्स गमावल्या होत्या. डावाच्या पहिल्या एक तासातच ऑस्ट्रेलियन गोलंदाज संघाला भक्कम स्थानावर घेऊन गेले. दुपारच्या जेवणापर्यंत इंग्लंडची धावसंख्या २६ षटकांमध्ये चार बाद ५९ धावा अशी होती. दुपारच्या जेवणानंतर देखील ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन कायमच ठेवले आणि इंग्लंड संघ ५०.१ षटकात अवघ्या १४७ धावांवर सर्वबाद झाला.
कर्णधार जो रुटने या संपूर्ण वर्षात अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. त्याने २०२१ मध्ये एकूण सहा वेळा शतकी खेळी केली आहे, तर एका अर्धशतकासह १४५५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २२८ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध या पहिल्या कसोटी सामन्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला.
या संपूर्ण वर्षात इंग्लंड संघाचे पहिले सात फलंदाज २९ वेळा शुन्य धावांवर बाद झाले आहेत आणि हा एक विश्वविक्रम बनला आहे. तत्पूर्वी १९८८ साली इंग्लंडचे पहिल्या सात क्रमांकावरील फलंदाज २७ वेळ शून्य धावांवर बाद झाले होते. आता २३ वर्षांनंतर पुन्हा इंग्लंडने हा नकोसा विक्रम केला आहे.
ELITE #Ashes pic.twitter.com/zaCSVVGX6F
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2021
जो रुटने यावर्षी ६३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्याव्यतिरिक्त इंग्लंडच्या सर्व फलंदाजांची यावर्षीची सरासरी ३० पेक्षा कमी आहे. यावरून संघाचे खराब प्रदर्शन दिसते. इंग्लंडसाठी दिग्गज बेन स्टोक्सने या सामन्यातून पुनरागमन केले, पण तो फक्त ५ धावा करून बाद झाला. इंग्लंडसाठी पहिल्या डावात जोश बटलरने सर्वाधिक ३९ धावा केल्या, तसेच ओली पॉपने देखील ३५ धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी ऑस्टेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने डावाच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्स (rory burns) याला शून्य धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर चौथ्या षटकात जोस हेजलवुडने (josh hazlewood) डेविड मलान (६) आणि सहाव्या षटकात कर्णधार जो रुट (०) यांना बाद करून इंग्लंडचे कंबरडे मोडले. ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात कर्णधार पॅट कमिन्सने ( pat cummins) सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क (mitchell starc) आणि जोश हेजलवूड ( josh hazlewood ) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर कॅमरून ग्रीनने एक विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या –
“भारताकडे यावेळी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात हरवण्याची सुवर्णसंधी”
क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ‘ऍशेस’
“संपूर्ण आठवडा तुम्ही माझ्यासोबत असाल”, ऍशेस मालिकेपूर्वी स्टोक्स वडिलांच्या आठवणीत भावुक