क्रिकेट इतिहासातील सर्वात मानाची कसोटी मालिका असलेल्या ऍशेस (Ashes 2021-2022) मालिकेचा रविवारी (१६ जानेवारी) समारोप झाला. होबार्ट येथील मालिकेतील पाचव्या व अखेरच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडला १४६ धावांनी पराभूत केले. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेवर ४-० असा कब्जा केला.मालिकेत शानदार कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेड (Travis Head) याला सामनावीर व मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
मालिकेतील पहिले तीन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकून विजयी आघाडी घेतली होती. तर, सिडनी येथील चौथा कसोटी सामना अनिर्णीत राहिलेला. पाचव्या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पुनरागमन करत असलेल्या ट्रेविस हेडच्या शतकाच्या व युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनच्या अर्धशतकाच्या जोरावर २४१ पर्यंत मजल मारलेली. दुसर्या दिवशी त्यांचे उर्वरित चार फलंदाज लवकर बाद झाले व ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०३ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडसाठी स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) मार्क वूड यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले होते.
त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव या मालिकेत ज्याप्रकारे इंग्लंडची अवस्था झाली आहे, तसाच राहिला. कर्णधार पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क यांनी अनुक्रमे ४ व ३ बळी घेत इंग्लंडची दयनीय अवस्था केली. या दोघांच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडचा डाव ४७.४ षटकामध्ये १८८ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडचा एकही फलंदाज अर्धशतक ठोकू शकला नाही. अष्टपैलू ख्रिस वोक्स याने सर्वाधिक ३६ धावा केल्या.
दुसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र, पहिल्या डावातप्रमाणे यावेळी देखील त्यांची सुरुवात खराब झाली. स्टुअर्ट ब्रॉड याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला खातेही खोलता तंबूचा रस्ता दाखवला. तसेच, मार्नस लॅब्युशेन ५ धावांवर माघारी परतला. उस्मान ख्वाजा हादेखील ११ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही.
तिसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली तेव्हा स्टीव्ह स्मिथ व नाईट वॉचमन स्कॉट बोलँड लवकर बाद झाले. पहिल्या डावातील शतकवीर हेड ८ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. एलेक्स केरीने ४९ धावांचे योगदान दिले. मात्र, मार्क वूडच्या ६ बळींमूळे ऑस्ट्रेलियाचा डाव १५५ धावांवर संपुष्टात आला.
इंग्लंडला या सामन्यात विजयासाठी २७१ धावांचे आव्हान होते. संपूर्ण मालिकेत वर्चस्व गाजवलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मालिकेतील या अखेरच्या डावातही शानदार गोलंदाजी केली. केवळ ३८.५ षटकात इंग्लंडचा डाव अवघ्या १२४ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड व कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले. इंग्लंडसाठी सलामीवीर झॅक क्राऊलीने सर्वाधिक ३६ धावा बनविल्या.
महत्त्वाच्या बातम्या-