लंडन। शनिवारी ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने विम्बल्डन २०२१ चे विजेतेपद जिंकले. हे तिचे कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. अव्वल मानांकित बार्टीने अंतिम सामन्यात आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाला पराभूत करत विम्बल्डनचे विजेतेपद जिंकले आहे.
बार्टीने १ तास ५५ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात प्लिस्कोवाला ६-३, ६-७(४), ६-३ अशा तीन सेटमध्ये पराभूत केले. बार्टीने सामन्याची सुरुवात दमदार केली होती. तिने सुरुवातीचे १४ पाँइंट्स आणि ४ गेम सलग जिंकत चांगली सुरुवात केली. तिने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला.
दुसऱ्या सेटमध्येही बार्टी ३-१ अशा फरकाने पुढे होती. मात्र, यावेळी प्लिस्कोवाने आपले सर्वस्व पणाला लावत या सेटमध्ये बरोबरी साधली. या सेटमध्येच ६-५ अशा फरकाने बार्टी आघाडीवर असल्याने सामना जिंकण्याची तिला संधी होती. मात्र, प्लिस्कोवाने हा सेट टायब्रेकरमध्ये नेला आणि हा सेट जिंकून सामन्यात बरोबरी साधली. पण तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा बार्टीने वर्चस्व राखत सामना आपणच जिंकू याची काळजी घेतली. साल २०१२ नंतर पहिल्यांदाच विम्बल्डनमध्ये महिला एकेरीचा अंतिम सामना तीन सेटचा झाला.
२५ वर्षीय बार्टी विम्बल्डन जिंकणारी इव्हान गुलॅगाँग कॉलीनंतरची पहिलीच ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू ठरली आहे. इव्हान गुलॅगाँग कॉली यांनी १९८० साली अखेरचे विम्बल्डन विजेतेपद जिंकले होते. विशेष म्हणजे गुलगाँग यांनी १९७१ साली जिंकलेल्या पहिल्या विम्बल्डन विजेतेपदाला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली.
???????? @ashbarty ???? Evonne Goolagong Cawley ????????
Whether it's 2021 or 1971, you always remember your first…#Wimbledon pic.twitter.com/djzUM8Buft
— Wimbledon (@Wimbledon) July 10, 2021
त्याचबरोबर २०१६ नंतर पहिल्यांदाच अव्वल मानांकन मिळालेली महिला टेनिसपटूने विम्बल्डनचे विजेतेपद जिंकले आहे. यापूर्वी २०१६ साली सेरेना विल्यम्सने अव्वल मानांकित असताना विम्बल्डन जिंकले होते. बार्टीने २०११ साली ज्यूनियर स्तरावरही विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले होते.
क्रिकेटही खेळली आहे बार्टी
टेनिसमध्ये आपली वेगळी ओळख मिळवणारी बार्टी क्रिकेटपटू देखील आहे. ती व्यावसायिक क्रिकेटही खेळली आहे. तिने २०१५ सालामध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी टेनिसमधून ब्रेक घेतला होता. ती महिला बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हिट संघाकडून खेळली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रॉजर फेडररचे विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात; तब्बल १९ वर्षांनंतर झाला ‘असा’ दुर्दैवी पराभव
जेव्हा गावस्कर म्हणाले होते, ‘ए चल फूट…’, थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत वीरूकडून बड्डेच्या हटके शुभेच्छा