दुबई। एशिया कप 2018 स्पर्धेत सुपर फोरची फेरी आज पासून सुरु झाली आहे. या फेरीत आज भारत विरुद्ध बांगलादेश संघात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामना सुरु आहे.
या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर 174 धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशला 49.1 षटकात 173 धावात रोखण्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने मोलाचे योगदान दिले. त्याने 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आहेत.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.
बांगलादेशची मात्र अडखळत सुरुवात झाली होती. त्यांनी 6 षटकातच त्यांचे लिटॉन दास(7) आणि नाझमुल हुसेन शान्तो(7) यांच्या विकेट गमावल्या होत्या. दासला भुवनेश्वर कुमार आणि नाझमुलला जसप्रीत बुमराहने बाद केले.
या दोन धक्क्यांनंतरही बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. त्यांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या.
पण नंतर बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्तझा(26) आणि मेहदी हसन(42) यांनी आठव्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी करत बांगलादेशला दिडशे धावांचा टप्पा पार करुन दिला होता.
मोर्तझाने 32 चेंडूत 26 धावा आणि मेहदी हसनने 50 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 42 धावा केल्या. मोर्तझाला भुवनेश्वरने आणि हसनला बुमराहने बाद केले.
मात्र बांगलादेशच्या अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. बांगलादेशकडून शाकिब अल हसन(17), मुशफिकूर रहिम(21) आणि मदमुल्लहा(25) यांनी थोडीफार लढत दिली होती. मात्र तेही खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर स्वस्तात माघारी परतले. यातील शाकिब आणि मुशफिकूर यांना जडेजाने बाद केले.
बांगलादेशच्या अन्य फलंदाजांपैकी मुसद्दक हुसेन(12), रुबेल हुसेन(2*) आणि मुस्तफिझुर रेहमान(3) यांनी धावा केल्या.
भारताकडून जडेजाने 4 तर अन्य गोलंदाजांपैकी भुवनेश्वर कुमार(3/33), जसप्रीत बुमराह(3/37), यांनी विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–वाढदिवस विशेष: सिक्सर किंग ख्रिस गेलबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
–किदांबी श्रीकांत बरोबरच सिंधूचीही चायना ओपनमध्ये निराशा
–वनडेत १० हजार धावा करणारा निवृत्त खेळाडू करतोय पुनरागमन!