दुबई। 18 सप्टेंबरला एशिया कप 2018 स्पर्धेत भारत विरुद्ध हाँग काँग यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात भारताने 26 धावांनी विजय मिळवला, मात्र हाँग काँगने भारताला दिलेल्या लढतीमुळे सर्वांचीच मने जिंकली.
या विजयामुळे भारताने पुढील फेरीत प्रवेश पक्का केला आहे, तर हाँग काँगचे एशिया कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे.
भारतासाठी सोपा असणारा विजय हाँगकाँगच्या सलामीच्या जोडीने चांगलाच संघर्षपूर्ण केला. या सामन्यात भारताकडून शिखर धवनने केलेल्या शतकानंतरही भारताला हाँग काँग समोर फक्त 286 धावांचे आव्हान उभे करता आले.
या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगचे सलामीवीर फलंदाज निजाकत खान आणि कर्णधार अंशुमन राठने भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले होते. त्यांनी भारताला पहिल्या 30 षटकात एकही विकेट मिळू दिली नव्हती.
या दोघांनी अर्धेशतके करताना पहिल्या विकेटसाठी तब्बल 174 धावांची भागीदारी रचली. मात्र या दोघांचेही शतक थोडक्यात हुकले. निजाकतने 115 चेंडूत 92 धावा केल्या. यात त्याने 12 चौकार आणि 1 षटकार मारला. तर अंशुमनने 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 97 चेंडूत 73 धावा केल्या.
या दोघांची जोडी फोडण्यात अखेर 35 व्या कुलदीप यादवला यश आले. त्याने अंशुमनला बाद केले. त्यानंतर काही वेळात नवोदीत खलील अहमदने निजाकतला बाद करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली पहिली विकेट मिळवली.
यानंतर मात्र हाँग काँगच्या फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट गमावल्याने धावगती वाढत गेली. त्यामुळे त्यांना 50 षटकात 8 बाद 259 धावाच करता आल्या.
भारताकडून खलील अहमद(3/48) युजवेंद्र चहल(3/46) आणि कुलदीप यादव (2/42) यांनी विकेट घेतल्या.
तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. पण भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा खेळपट्टीवर स्थिर झाल्यानंतर 23 धावा करुन बाद झाला. पण यानंतर शिखर धवन आणि अंबाती रायडूने 116 धावांची शतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला.
पण ही जोडी 30 व्या षटकात तोडण्यात एहसान नवाजला यश आले. त्याने अर्धशतक करणाऱ्या रायडूला बाद केले. रायडूने 70 चेंडूत 60 धावा करताना 3 चौकार आणि 2 षटकार मारले.
रायडू बाद झाल्यानंतर धवन आणि कार्तिकने मिळून तिसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी रचली. मात्र शतक केल्यावर खराब फटका मारुन धवनने विकेट गमावली. त्याने 120 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 127 धावा केल्या.
त्याच्या नंतर एमएस धोनीही लगेचच खराब फटका मारुन बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर कार्तिकनेही 33 धावा करुन विकेट गमावली. अखेर भारताला चांगल्या सुरुवातीनंतरही 50 षटकात 7 बाद 285 धावांवरच समाधान मानावे लागले.
भारताकडून अन्य फलंदाजांपैकी केदार जाधव(28*) आणि भुवनेश्वर कुमारने(9) धावा केल्या.
तसेच हाँग काँगकडून किंचीत शहाने 39 धावात सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर अन्य गोलंदाजांपैकी एहसान खान(2/65), एहसान नवाज(1/50) आणि ऐजाज खान (1/41) विकेट घेतल्या.
भारतासमोर आता 19 सप्टेंबरला पाकिस्तानचे आव्हान असणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप ५: शिखर धवनने दमदार शतक करत केले हे खास विक्रम
–टॉप ५: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान या विक्रमांकडे असणार लक्ष
–एशिया कप २०१८: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल सर्वकाही…