दुबई। 19 सप्टेंबरला 14 व्या एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघात साखळी फेरीतील सामना पार पडला. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने मोठा विजय मिळवून स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला.
या सामन्यात अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने महत्त्वाच्या तीन विकेट्स घेऊन भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. त्याने या सामन्यात 23 धावात 3 विकेट्स घेतल्या.
केदारने त्याच्यातील विकेट घेण्याची क्षमता ओळखण्याचे श्रेय भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला दिले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना केदार म्हणाला, “जेव्हापासून मला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनीने गोलंदाजी करायला सांगितली तेव्हापासून माझे आयुष्य बदलले आहे.”
2016 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध त्यावेळी कर्णधार असणाऱ्या धोनीने केदारला गोलंदाजी करण्यासाठी चेंडू सोपवला होता.
केदारने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आयपीलदरम्यान झालेल्या दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याला आयपीएलच्या पहिल्याच सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती.
या दुखापतीतून परतल्यानंतर पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना त्याने चांगली गोलंदाजी केली आहे.
याबद्दल तो म्हणाला, “मी नेटमध्ये जास्त गोलंदाजी करत नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी सामन्याआधी सराव सत्रात मी काही षटकेच गोलंदाजी केली. मला असे वाटते की जर मी नेटमध्ये प्रयत्न करुन माझ्या गोलंदाजीवर काम केले तर माझ्या गोलंदाजीत जी गोष्ट आहे ती निघून जाईल. त्यामुळे मी माझ्या मर्यादेतच राहतो.”
“आमच्याकडून जी अपेक्षा असते तेच करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. योग्य जागेवर गोलंदाजी केल्याने जेव्हा क्षेत्ररक्षक वर्तुळात असतात तेव्हा फलंदाजांवर दबाव टाकता येतो. जर या प्रक्रियेवरनुसार गेलो तर निकाल आपोआपच मिळतो.”
याबरोबरच तो म्हणाला की त्याच्या दुखापतीनंतर त्याचा फिटनेस सुधारला आहे. तसेच यामुळे त्याला मदत मिळली आहे आणि त्याला पूर्णपणे वेगळा क्रिकेटपटू बनवले आहे.
त्याचबरोबर तो म्हणाला, पाकिस्तानविरुद्धचे सामने नेहमीच रोमांचकारी असतात पण आम्ही प्रत्येक संघाबरोबर सारख्याच भावनेने खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कप २०१८: टीम इंडियाला मोठा धक्का, हे तीन खेळाडू स्पर्धेबाहेर
–एशिया कप २०१८: सुपर फोरचे सामने पूर्वनियोजित असल्याचा कर्णधारांचा आरोप?