Loading...

एशिया कप २०१८: ४ दिवसांत पाकिस्तानचा टीम इंडियाकडून दोनदा दारुण पराभव

दुबई। रविवार, 23 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान संघात एशिया कप 2018 स्पर्धेचा सुपर फोरमधील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 9 विकेटने सहज आणि एकहाती विजय मिळवला.

Loading...

भारताचे सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि रोहित शर्मा दोघांनीही शतके करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांना 34 व्या षटकापर्यंत एकही विकेट घेण्यात यश मिळू दिले नव्हते. या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 210 धावांची द्विशतकी भागीदारी केली.

याबरोबरच या दोघांच्या जोडीने एशिया कपमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचाही विक्रम केला आहे.

या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 238 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखरने आक्रमक सुरुवात केली होती, तर रोहितने सावध सुरुवात केली होती.

Loading...

पण खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर या दोघांनीही पाकिस्तानच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. अखेर भारताला विजयासाठी फक्त 28 धावांची गरज असताना शिखर 34 व्या षटकात धावबाद झाला.

त्याने 100 चेंडूत 114 धावा करताना 16 चौकार आणि 2 षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर अंबाती रायडूने(12*) रोहितला चांगली साथ देत 40 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडुवर एक धाव काढत भारताचा विजय निश्चित केला. भारताने 238 धावांचे आव्हान 39.3 षटकात पूर्ण केले.

रोहितने 119 चेंडूत 111 धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले.

Loading...
Loading...

तत्पूर्वी पाकिस्तानकडून अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने अर्धशतक करत पाकिस्तानला 200 धावांचा टप्पा पार करुन देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे सलामीवीर फलंदाज फकार जामन आणि इमाम उल हकने डावाची सुरुवातही चांगली केली होती. परंतू 10 धावा केल्यानंतर इमामला फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने पायचीत बाद केले.

Loading...

यानंतरही बाबर आझम आणि फकारने सावध खेळ केला होता. पण 15 व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना फकार एक फटका मारताना घसरला आणि तो चेंडू त्याच्या पॅडला लागला, त्यामुळे त्याला पायचीद बाद देण्यात आले. परंतू नंतर दिसले की तो चेंडू त्याच्या ग्लव्हजला लागून गेला होता.

फकारच्या पाठोपाठ लगेचच फॉर्ममध्ये असलेला बाबर आझमही धावबाद झाला. त्याला या सामन्यात 9 धावाच करता आल्या.

या 3 विकेट झटपट गमावल्यानंतर मात्र चौथ्या क्रमांकावर बढती घेऊन खेळायला आलेला पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद आणि शोएब मलिकने डाव सावरताना 107 धावांची शतकी भागीदारी रचली.

या जोडीने एक-दोन धावा काढत धावफलक हालता ठेवला होता. अखेर कुलदीपला ही जोडी तोडण्यात यश आले. त्याने सर्फराजला रोहित शर्माकडे झेल देण्यास भाग पाडले. सर्फराजने 66 चेंडूत 44 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार मारले.

सर्फराज बाद झाल्यानंतर असिफ अलीने फलंदाजीला येत छोटेखानी पण तुफानी खेळी केली. त्याने आणि मलिकने मिळून 42 व्या षटकात 22 धावा काढल्या. यावेळी भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत होता.

मात्र त्यानंतर खेळपट्टीवर स्थिर असलेल्या मलिकला बाद करण्यात जसप्रीत बुमराहला यश आले. त्याने मलिकला यष्टीरक्षक धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. मलिकने 90 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 78 धावांची अर्धशतकी खेळी केली.

याच्या पाठोपाठ असिफलाही चहलने बाद केले.असिफ 21 चेंडूत 30 धावा करुन बाद झाला.

यानंतर शादाब खान (10) आणि मोहम्मद नवाजने(15*) पाकिस्तानला 50 षटकात 7 बाद 237 ही धावसंख्या गाठून दिली.

भारताकडून जसप्रीत बुमराह(2/29) ,कुलदीप यादव(2/41) आणि युजवेंद्र चहलने (2/46) यांनी विकेट घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर

…आणि पाकिस्तानचे चाहते जोरदार भडकले

You might also like
Loading...