एशिया कप (Asia Cup) २०२२च्या स्पर्धेसाठी संघ सज्ज झाले आहेत. या मालिकेतील पहिला सामना २७ ऑगस्टला यजमान संघ श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान याच्यात खेळला जाणार आहे. हे सर्व सामने युनायटेड अरब अमिराती (युएई) येथे खेळले जाणार आहेत. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांना काही विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) हा कर्णधार झाल्यापासून भारताने एकही मालिका गमावलेली नाही. अशातच एशिया कपमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.
भारत एशिया कपमध्ये सर्वाधिक विजेतेपद मिळवणारा संघ आहे. भारत आतापर्यंत सात वेळा एशिया कपचा मानकरी ठरला आहे. त्यामध्ये टी२० प्रकारातील एका विजेतेपदाचा समावेश आहे. २०१६मध्ये टी२० प्रकारातील एशिया कपमध्ये भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. यामुळे भारत त्याच प्रकारच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्नात असणार आहे.
एशिया कपमध्ये रोहित शर्मा कर्णधाराच्या रूपात
रोहितने एशिया कपमध्ये भारताचे नेतृत्व करताना ५ सामने जिंकले आहेत. यावेळी तो १० किंवा त्यापेक्षा अधिक सामने जिंकणारा दुसरा कर्णधार ठरेल. यंदा भारताला साखळी फेरीत २ सामने खेळायचे आहेत. त्यासाठी भारताला सुपर ४ आणि अंतिम सामना खेळावा लागणार आहे.
एशिया कपमध्ये भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याने १० पेक्षा अधिक सामने जिंकले आहेत. त्याने एशिया कपमध्ये कर्णधार म्हणून १९ सामने खेळले आहेत. त्यातील १४ सामने भारताने जिंकले तर ४ सामन्यांत पराभव झाला. दुसरीकडे रोहित कर्णधार असताना भारताने ५ सामने खेळले असून पाचही सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. यामुळे एशिया कपमध्ये रोहितच्या जिंकण्याची टक्केवारी १०० आहे.
एशिया कपमध्ये भारतीय कर्णधारांची कामगिरी
या स्पर्धेत भारतीय कर्णधारांची विक्रमे पाहिली तर मोहम्मद अजहरुद्दीन यांनी ७ पैकी ५, सौरव गांगुली यांनी ९ पैकी ४, दिलीप वेंगसरकर यांनी ४ पैकी ३ तर सचिन तेंडूलकरने ४ पैकी १ सामने जिंकले आहेत. तसेच विराट कोहली याने ४ सामन्यांत भारताचे नेतृत्व केले असून त्यातील २ सामने संघाने जिंकले.
एशिया कपमध्ये पाकिस्तानच्या कर्णधारांची कामगिरी
यंदा बाबर आझम पहिल्यांदाच एशिया कपमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तानकडून सर्वाधिक यशस्वी कर्णधार मिसबाह उल हक ठरला आहे. त्याने १० पैकी ७ सामने जिंकले. तर कर्णधार म्हणून मोईन खानने ६, इंजमाम उल हकने ४ आणि शाहीद आफ्रिदीने ३ सामने जिंकले आहे.
बाबरकडे इंजमाम, आफ्रिदी यांचा विक्रम मोडण्याची संधी
टी२० प्रकारच्या या एशिया कपमध्ये बाबर कर्णधार म्हणून ६ सामने खेळण्याची शक्यता आहे. तो हे सर्व सामने जिंकला तर त्याच्याकडे इंजमाम आणि आफ्रिदी यांना मागे टाकण्याची संधी आहे. तर मोईन खानची बरोबरी करण्याचीही संधी आहे. पाकिस्तानने दोन वेळा एशिया कप जिंकला आहे.
एशिया कपसाठी पात्र ठरलेले संघ
या स्पर्धेसाठी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर क्वालिफायर्सच्या फेरीमध्ये सिंगापूर, हाँगकाँग, कुवेत आणि युएई यांच्यात सामने होणार आहेत. हे सामने २० ऑगस्टपासून खेळले जाणार आहेत. यातील फक्त एकच संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ZIMvsIND: राहुलने गाजवलेलं झिम्बाब्वेविरुद्धच पदार्पण, आता कॅप्टन म्हणून मिळवणार पहिला विजय?
द हंड्रेडमध्ये डेविड मलानचा राडा! २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने केल्या तब्बल ‘इतक्या’ धावा






