आशिया चषक (Asia Cup) 2022मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सुपर फोरचा सामना रोमांचक झाला. रविवारी (4 सप्टेंबर) हा सामना दुबई येथे खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचलेल्या या सामन्यात पाकिस्तानने 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या पराभवामागचे कारण सांगितले आहे. तसेच त्याने या पराभवाला कोण जबाबदार हे पण सामन्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यावेळी भारताला केएल राहुल आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. मात्र मधल्या फळीत विराट कोहली (Virat Kohli) याच्या व्यतिरिक्त बाकी फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. हेच भारताच्या पराभवामागचे मोठे कारण रोहितने सांगितले आहे. विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत 60 धावा केल्या. तर हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत खराब शॉट खेळून लवकरच आपली विकेट गमावून बसले.
सामन्यानंतर रोहित म्हणाला, “हा एक दबावात्मक सामना होता. अशा परिस्थितीत आपण एकही संधी गमावू शकत नाही. जेव्हा रिजवान आणि नवाज यांच्यात भागीदारी होत होती तेव्हा आम्ही शांत होतो. आम्हाला वाटले आम्ही एखादी विकेट घेतली तर सामना आमच्या बाजूने होईल, मात्र दोघांनी उत्तम फलंदाजी केली. अशा सामन्यांमध्ये योग्यप्रकारे खेळले पाहिजे. आम्ही जी धावसंख्या केली त्यासाठी चांगली गोलंदाजी करण्याची आवश्यकता होती. अशा प्रकारच्या सामन्यांमधून तुम्ही खूप काही शिकता.”
“जर तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर विकेट घेणे गरजेचे आहे. टी20 क्रिकेटमध्ये कोणतेच लक्ष्य मोठे नसते. आम्हाला पाकिस्तानला सामना जिंकण्याचे श्रेय द्यायला हवे, त्यांनी खूपच चांगली कामगिरी केली. विराटने ज्याप्रकारे फलंदाजी केली ती खरच अप्रतिम होती. त्यावेळी हार्दिक आणि पंतच्या विकेटची काहीही गरज नव्हती. मात्र जशा विकेट गेल्या असा स्थितीत आम्हाला खेळपट्टीवर टीकणाऱ्या फलंदाजाची आवश्यकता आहे,” असेही रोहित पुढे म्हणाला. या सामन्यात रोहितने 16 चेंडूत 28 धावा केल्या. त्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.
मागील आठवड्यात झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या साखळी सामन्यात हार्दिक विजयाचा नायक ठरला होता. तर सुपर फोरच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. त्याला मोहम्मद हसनैन याने मोहम्मद नवाज याच्याकरवी झेलबाद केले. तो दोन चेंडू खेळताच तंबूत परतला. तसेच त्याच्याआधी पंतची विकेट गेली होती. त्याने 12 चेंडूत 2 चौकार मारत 14 धावा केल्या. त्याला शादाब खान याने आसिफ अली याच्याकरवी झेलबाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चोरांच्या उलट्या बोंबा! अर्शदीपवर चिडला, पण कॅप्टन रोहितने स्वतःच दुसऱ्यांदा केली ‘ही’ मोठी चूक
एका कॅचमुळे खलनायक ठरलेल्या अर्शदीपची विराटकडून पाठराखण; म्हणाला, ‘दबावात कोणा…’
…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली




