आशिया चषक २०२२ चे बिगूल वाजले असून सर्व आशियाई संघ या स्पर्धेसाठी जोमाने तयारीला लागले आहेत. येत्या २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी एकापाठोपाठ एक संघांना धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. भारताचा जसप्रीत बुमराह, पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी, बांगलादेशचे हसन मेहमूद, मेहदी हसन यांच्यानंतर आता श्रीलंकेच्या संघाला झटका बसू शकतो. त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरा दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी (१९ ऑगस्ट) सराव सत्रादरम्यान चमीराला (Dushmantha Chameera) दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या पायावर ताण आल्याने तो सराव सत्र मध्यभागी सोडून गेला होता. अशात आता या दुखापतीमुळे तो संपूर्ण आशिया चषकातून बाहेर झाला असल्याचे समजत आहे. त्याला सध्या क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकिय पथकाच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे.
रोहित शर्मासाठी असेल आनंदाची बातमी!
टी२० क्रिकेटमध्ये रोहितसाठी चमीरा नेहमीच कर्दनकाळ ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या सर्वात छोट्या स्वरूपात रोहितने फक्त ९ डावांमध्ये चमीराचा सामना केला आहे. ज्यामध्ये तो फक्त ५.३३ च्या सरासरीने धावा काढू शकला आहे. रोहितने चमीराच्या गोलंदाजीवर टी२०त फक्त ३२ धावा करू शकला आहे. तसेच चमीराने यादरम्यान रोहितला ६ वेळा बाद केले आहे. त्यामुळे आता चमीरा आशिया कपमधून बाहेर झाल्याने रोहितची डोकेदुखी नक्कीच कमी झाली असावी.
आशिया चषक २०२२ साठी श्रीलंका संघ: दासुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणातिलका, पथुम निसंका, कुशल मेंडिस, चरित असलंका, बानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानिंदु हसरंगा, महेश थीक्षाना, जेफरी वांडरसे, प्रवीण जयविक्रेमा, बिनुरा फर्नांडो, चामिका फर्नांडो, मदुशंका, मथीशा पथिराना, दिनेश चांदीमल, नुवानिंदु फर्नांडो, कसुन रजिता