बुधवारपासून (दि. 30 ऑगस्ट) आशिया चषक 2023च्या कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघात खेळला जाणार आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक स्पर्धा वनडे क्रिकेट प्रकारात खेळवली जात आहे. मागील वर्षीही जेव्हा आशिया चषकाचे आयोजन झाले होते, तेव्हा टी20 विश्वचषक असल्यामुळे स्पर्धा टी20 क्रिकेट प्रकारात खेळवली गेली होती. आता पुन्हा एकदा आशिया चषकाचा घाट घातला जात आहे. अशात चाहत्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले असतील. जसे की, आतापर्यंत किती वेळा स्पर्धा खेळली गेली आहे? कोणत्या संघाने सर्वाधिक किताब जिंकले आहेत? अशा सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत…
कधी सुरू झाली आणि सर्वाधिक किताब कुणाकडे?
आयसीसी स्पर्धांव्यतिरिक्त आशिया चषक (Asia Cup) ही आशिया खंडातील मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेत आशियातील सर्व मोठे संघ भाग घेतात. ही स्पर्धा 1984 पासून खेळली जात आहे. आतापर्यंत 15 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन झाले आहे. मागील वर्षी पाकिस्तान (Pakistan) संघाला पराभूत करत श्रीलंका (Sri Lanka) संघाने हा किताब आपल्या नावे केला होता. श्रीलंका संघ 2022मध्ये सहाव्यांदा आशिया चषक विजेता बनला होता. तसेच, भारताने सर्वाधिक 7 वेळा, तर पाकिस्तानने फक्त 2 वेळा आशिया चषक जिंकला आहे.
यावेळी किती संघ घेतायेत भाग?
एशिया कप 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत एकूण 6 संघ भाग घेत आहेत. यामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ आशियाचे 5 पूर्णवेळ सदस्य देश आहेत. तसेच, नेपाळ संघ पहिल्यांदाच या स्पर्धेचा भाग बनला आहे.
नेपाळचे आशिया चषकात पदार्पण
नेपाळ संघ पहिल्यांदाच आशिया चषक 2023 स्पर्धेत खेळणार आहे. 30 ऑगस्ट रोजी स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ (Pakistan vs Nepal) संघात खेळला जाईल. नेपाळने यावर्षी एप्रिल-मेमध्ये एसीसी पुरुष प्रीमिअर चषक जिंकून आशिया चषकासाठी क्वालिफाय केले होते. क्वालिफाय स्पर्धेत 10 देशांनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या अंतिम सामन्यातन नेपाळने यूएईला पराभूत केले होते. नेपाळ संघ वनडे रँकिंगमध्ये सध्या 15व्या स्थानी आहे. रोहित पौडेल (Rohit Paudel) हा 20 वर्षीय युवा कर्णधार आशिया चषक 2023 स्पर्धेत नेपाळचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
कसे होणार आयोजन?
आशिया चषकात एकूण 6 संघ भाग घेत आहे, जे 2 वेगवेगळ्या गटात विभागले गेले आहेत. अ गटात भारत, नेपाळ आणि पाकिस्तान संघांना ठेवण्यात आले आहे. तसेच, ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. यानंतर अव्वल 2 संघ सुपर 4 फेरीत एन्ट्री करतील. सुपर 4 फेरीत प्रत्येक संघ एकमेकांशी एक वेळा भिडतील. तसेच, अव्वल 2 संघ अंतिम सामन्यासाठी क्वालिफाय करतील. उद्घाटनाचा सामना 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तान-नेपाळ संघात होईल, तर अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. अंतिम सामन्यासह स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जातील.
पाकिस्तान-श्रीलंका दोन्ही संघ भूषवणार यजमानपद
पाकिस्तान संघाला यावर्षी आशिया चषकाच्या यजमानपदाची जबाबदारी मिळाली होती. मात्र, भारताने तिथे जाऊन सामने खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने खेळवली जाईल, असे निश्चित झाले. याअंतर्गत मुल्तान आणि लाहोर येथे आशिया चषकाचे 4 सामने खेळले जातील, तर श्रीलंकेच्या पल्लेकेले आणि कोलंबो येथे अंतिम सामन्यासह एकूण 9 सामने होतील.
भारत सुपर-4 सामना पाकिस्तानमध्ये खेळेल का?
भारत आपला कोणताही सामना पाकिस्तानात खेळणार नाहीये. पहिल्या फेरीत कोणत्याही स्थानी राहिला, तरी पाकिस्तान A1 आणि भारत A2 रूपात सुपर-4 (Super-4 Asia Cup) फेरीत जाईल. तसेच, ब गटात श्रीलंका B1 आणि बांगलादेश B2 असेल. दोन्ही गटातील तिसऱ्या संघांनी नेपाळ किंवा अफगाणिस्तानने सुपर-4 फेरीसाठी क्वालिफाय केले, तर ते बाहेर होणाऱ्या संघांची जागा घेतील. भारत, जर सुपर-4 फेरीसाठी क्वालिफाय करण्यात यशस्वी झाला, तर आपले सामने कोलंबो येथे खेळेल.
सामने कधी होणार सुरू?
आशिया चषक 2023 स्पर्धेचे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3 वाजता खेळले जातील. भारत, श्रीलंका आणि उपखंडातील कोणत्याही भागात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हे सर्व सामने पाहता येतील. तसेच, डिज्नी प्लस हॉटस्टारवर मोफत या सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल. आता चाहते आतुरतेने ही स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. (asia cup 2023 format where when who whats new india know about this tournament here)
हेही वाचलंच पाहिजे-
Asia Cup 2023पूर्वी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोलमडला श्रीलंका संघ, चार धुरंधर स्पर्धेतून बाहेर; वाचा यादी
वनडे क्रिकेटबाबत सूर्यकुमारचा मोठा दावा! आशिया चषकात सुटणार चांगल्या फॉर्मचे कोडे