रविवारी (दि. 10 सप्टेंबर) आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर- 4 फेरीतील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता गगनाला भिडली आहे. उभय संघ साखळी फेरीत कँडी येथे आमने-सामने आले होते, पण पावसाने सगळा घोळ घातला आणि सामना रद्द करावा लागला. आता सुपर फोर फेरीत कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी काही आकडेवारी समोर येत आहे. यानुसार, कोलंबोमध्ये पाकिस्तानचे आकडे भारतीय संघाच्या पुढे आहेत. यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडू शकते. खास बाब अशी की, ज्यावेळी 2004मध्ये जेव्हा दोन्ही संघ आमने-सामने होते, तेव्हा पाकिस्तान विजयी झाला होता.
कोलंबो येथे कशी आहे भारत-पाकिस्तानची आकडेवारी?
भारतीय संघाने कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये एकूण 46 सामने खेळले आहेत. या सामन्यांपैकी 23 सामन्यांमध्ये भारताच्या पारड्यात विजय पडला आहे. तसेच, 19 सामन्यात भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तसेच, 4 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. या स्टेडिअममध्ये भारताची विजयी टक्केवारी ही 50 टक्के आहे. तसेच, पाकिस्तान संघाविषयी बोलायचं झालं, तर पाकिस्तानने कोलंबो येथे एकूण 24 सामने खेळले आहे. यापैकी 14 सामन्यात पाकिस्तानला विजय मिळाला आहे, तर 8 सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. तसेच, दोन सामन्यांचे निकाल लागले नाहीत. पाकिस्तान संघाची या मैदानावरची विजयी टक्केवारी ही 58.33 इतकी आहे. म्हणजेच, या बाबतीत पाकिस्तान भारताच्या पुढे आहे.
सन 2004 चा हिशोब चुकता करण्यासाठी उतरणार भारत
आशिया चषक 2004 (Asia Cup 2004) स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात कोलंबो येथील याच मैदानावर सामना खेळला गेला होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत 300 धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये शोएब मलिकने 143 धावांची झंझावाती खेळी साकारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 241 धावांवर समाधान मानावे लागले होते. मलिकने गोलंदाजी करताना 2 विकेट्सही घेतल्या होत्या. त्यानंतर 2010मध्ये दांबुला येथे भारताने श्रीलंकेच्या धरतीवर पाकिस्तानला पराभूत केले होते. मात्र, कोलंबोतील पराभवाच्या वेदना आजही भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात आहेत. त्या पराभवाचा 19 वर्षांनंतर हिशोब चुकता करण्यासाठी भारत मैदानावर उतरणार आहे.
श्रीलंकेतील आकडेवारीत भारत पुढे
भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यात श्रीलंकेत तसे पाहिले, तर एकूण 4 सामने खेळले गेले आहेत. मात्र, दोन सामने 1997मध्ये पावसामुळे खेळले गेले नव्हते. त्यानंतर 2004मध्ये आशिया चषकात पाकिस्ताने भारताला पराभूत केले होते. त्यानंतर भारताने 2010मध्ये दांबुला येथे पाकिस्तानला पराभूत केले होते. वैयक्तिक आकडेवारीविषयी बोलायचं झालं, तर भारताने श्रीलंकेत एकूण 66 सामने खेळले आहेत. त्यात भारताला 31 सामने जिंकण्यात यश आले आहे. तसेच, 28 सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. यातील 7 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. दुसरीकडे, पाकिस्तानविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी श्रीलंकेत 42 सामने खेळले आहेत. त्यात 18 सामन्यात विजय, तर 20 सामन्यात पराभव पत्करावा लागलेा आहे. तसेच, 4 सामने अनिर्णित राहिले आहेत. (asia cup 2023 ind vs pak record in colombo individual winning percentage at venue know here)
हेही वाचाच-
IND vs PAK: राखीव दिवशीही पाऊस पडला तर…? एका क्लिकवर मिळेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर
विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडला जबरदस्त धक्का! स्टार गोलंदाज वनडे मालिकेतून बाहेर, लगेच वाचा