भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुपर- 4मधील चौथा सामना पार पडला. हा सामना जिंकत भारतीय संघ आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला. असे असले, तरीही श्रीलंकेच्या एका प्रतिभावान खेळाडूने आपल्या शानदार प्रदर्शनाने सर्वांची मने जिंकली. अवघ्या 20 वर्षीय दुनिथ वेललागे याने फक्त 10 षटकात 40 धावा खर्चून 5 विकेट्सच घेतल्या नाहीत, तर संघ अडचणीत असताना 8व्या स्थानी फलंदाजी करत 46 चेंडूत नाबाद 42 धावांचेही महत्त्वपूर्ण योगदान दिले. यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकारांचाही समावेश होता. तो या सामन्याचा हिरो ठरला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. या सामन्यानंतर दुनिथने एका भारतीय गोलंदाजाचे भरभरून कौतुक केले.
वेललागेने कुलदीपचे केले कौतुक
दुनिथ वेललागे (Dunith Wellalage) याने सामन्यानंतर भारतीय संघ (Team India) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांचे कौतुक केले. तो म्हणाला, “सर्वप्रथम भारतीय संघाचे अभिनंदन करू इच्छितो. दुर्दैवाने आज आम्ही पराभूत झालो. मात्र, आमच्याकडे आणखी एक सामना आहे. आम्ही अंतिम सामन्यात जागा मिळवू शकतो.”
पुढे बोलताना वेललागे म्हणाला, “कुलदीप यादव एक महान गोलंदाज आहे. त्याने शानदार गोलंदाजी केली. मी माझा सामान्य खेळ खेळणे आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला.” तुला कसे वाटत होते? या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला, “मी लहान वयापासूनच खूप मेहनत घेतली आहे. मी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला. मी माझ्या संघाच्या सहकाऱ्यांना आणि कोचिंग स्टाफला धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी मला भरपूर पाठिंबा दिला.”
कुलदीपची कामगिरी
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 214 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा डाव 172 धावांवर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. यावेळी कुलदीप यादव याने शानदार प्रदर्शन केले. त्याने 9.3 षटकात 43 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या. जसप्रीत बुमराह याने 7 षटकात 30 धावा खर्चून 2 विकेट्स, तर रवींद्र जडेजा याने 10 षटकात 33 धावा खर्चून 2 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. हा सामना भारताने 41 धावांनी जिंकला. तसेच, स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. अशात, अंतिम सामन्यात भारताविरुद्ध कोण खेळणार, याचा निकाल पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघातील 14 सप्टेंबर रोजीच्या सामन्यानंतर समजेल. (asia cup 2023 india vs sri lanka dunith wellalage praised this indian bowler congratulate team india)
हेही वाचा-
ही दोस्ती तुटायची नाय! श्रीलंकेविरुद्ध पाहायला मिळाला रोहित-विराटचा ब्रोमान्स; एकमेकांवर प्रेमाची उधळण- Video
Final गाठताच रोहितकडून एक विकेट घेणाऱ्या ‘या’ गोलंदाजाचे कौतुक; म्हणाला, ‘असं वाटलं तो प्रत्येक बॉलवर…’